गेल्या आठवडय़ात एक वाईट बातमी वाचली. विख्यात धावपटू मिल्खा सिंग आणि त्यांची पत्नी या दोघांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही महिन्यात असे झाले आहे की निधन म्हटल्यावर कोरोना हेच त्याचे कारण असणार अशी आपली मनोमन खात्री पटलेली असते.
देशभर लसीकरण अद्याप चालूच आहे. पूर्वी माणसे रेशनसाठी, दुधासाठी, रॉकेलसाठी रांगा लावायची. रांगेतली कितीतरी माणसे निराश व्हायची. हल्ली माणसे रोज लस घेण्यासाठी रांगा लावतात. ‘मुखी कुणाच्या पडते लोणी’ तशी कोणाच्या दंडावर लस टोचली जाते. बाकीचे निराश होऊन परततात. किती दिवस हे चालणार, समजत नाही. एक वेगळीच भीती वाटते. मिल्खा सिंग असोत की गेल्या काही महिन्यात कोरोनाची लागण झालेले आणि प्राण गमावणारे मोठे मोठे खेळाडू, कलाकार, व्यापारी, राजकारणी, धनदांडगे असोत… यांना काय लस मिळाली नसेल? यांनी काय दक्षता बाळगली नसेल? आपणा सामान्य माणसाकडे दक्षता घेण्यासाठी जी साधने आहेत, त्याहून अधिक साधने या मोठय़ा लोकांकडे असतील. त्यांनी ती वापरली असतील. तरी त्यांना कोरोनाने गाठले.
महाभारतात परिक्षित राजाची एक गोष्ट आहे. तक्षक नागाचा परिक्षित राजाच्या घराण्यावर जुना राग होता. त्याने सूड घ्यायचे ठरवले. राजाला ते समजले. राजाने एक उंच महाल बांधून घेतला आणि त्याभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली. महालात वरच्या मजल्यावर रहायला गेला. त्याला वाटले की आपण आता सुरक्षित झालो. पण एकदा खिडकीतून बाहेर बघताना त्याला बोरे विकणारा दिसला, बोरे खायची इच्छा झाली. त्याने सेवकांकडून बोरे मागवली. पहिले बोर खाताना त्यात एक अळी निघाली. राजा ते टाकून देणार तितक्मयात अळीने आपले खरे स्वरूप धारण केले. ती अळी नव्हती, तर वेष पालटलेला तक्षक होता. त्याने तत्काळ राजाचा वध केला.
कोरोनाच्या संदर्भात मोठय़ा माणसांच्या बातम्या वाचताना मला नेहमी परिक्षित राजा आठवतो. राजा स्वतःला वाचवू शकला नाही. आपण कोण. राजाला बोरांचा मोह पडला. काही लोकांना लॉकडाऊन मोडून, पोलिसांचा डोळा चुकवून गर्दीत जायचा, विना मास्क फिरायचा मोह होतो. अशी माणसे म्हणजे बोरे आहेत असे वाटते.
मी जीव मुठीत घेऊन माझ्या कोनाडय़ात बसलेलो आहे. बोरांचा मोह टाळण्याचा प्रयत्न करतो आहे.








