गोकुळ शिरगाव/वार्ताहर
राजकारण व समाजकारण करत असताना हार जीत ही ठरलेलीच असते. यावेळची विधानसभा लढवताना आपण नेहमी लोकांच्या संपर्कात असल्याने लोकांनी आपल्याला भरभरून मतदान दिले पण थोडक्यात आपला पराभव झाला. या पराभवाला न खचून जाता आपण पुन्हा जोमाने ताकतीने समाजकार्यात काम करत राहणार असून पुढच्या निवडणुकीत सुद्धा मी पुन्हा येईन…… असा दावा शाहू कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केला.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकार दिनानिमित्त शाहू कारखाना येथे आयोजित केलेल्या पत्रकार गुणगौरव कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी घाटगे यांनी केलेल्या ‘मी पुन्हा येईल‘ यावर सभागृहात एकच हशा पिकला. व पुन्हा एकदा पुन्हा येईन च्या नाऱ्याला दुजोरा मिळावा.
शाहू कारखान्याच्या वतीने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दर सहा जानेवारीला कागल, गडहिंग्लज व करवीर तालुक्यातील कारखान्याशी निगडीत असलेल्या गावातील पत्रकारांचा गुणगौरव केला जातो. समाज घडवण्यासाठी पत्रकार हा खूप मोलाचा वाटा उचलतो यासाठी आपण दरवर्षी हा गुणगौरव व कौतुक सोहळा करत असल्याचे घाटगे यांनी सांगितले. विधानसभेच्या निवडणुकीवर भाष्य करत असताना आपण इथून पुढच्या काळात राजकारण करत शाहू कारखाना, शाहू शिक्षण संस्था, कागल बँक, दूध संघाचा विस्तार करण्यात आपला जोर राहणार असून तरुणांना संघटित करून रोजगार वाढवण्याचा आपला ध्यास असल्याचे सांगितले.
यावेळी या सोहळयास कारखाना स्थळावर जवळपास दीडशे पत्रकार उपस्थित होते. या सर्व प्रतिनिधींचा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक व कारखान्याचे कॅलेंडर व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.









