मगोचे फोंडा गटाध्यक्ष अनिल नाईक यांची टीका
वार्ताहर/ मडकई
भाजपाने सत्तेसाठी फोंडा नगर पालिकेतील मगो पक्षाच्या नगरसेवकांना पळवून नेले असले तरी मगो पक्षाचे प्राबल्य तिळ मात्र कमी झालेले नाही. फोंडय़ातच नव्हे तर संपूर्ण गोव्यात जो पर्यंत मगो पक्षाचे कार्यकर्ते व मतदार पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, तो पर्यंत मगो पक्ष जिवंत असेल. भाजपाला आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाची भिती असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली असल्यानेच त्यांनी हे फोडाफोडीचे राजकारण चालू केले असल्याची टीका मगो पक्षाचे फोंडा गटाध्यक्ष अनिल नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
जनसामान्यांच्या हृदयात मगो पक्ष असल्यामुळे या पक्षाचे भवितव्य उज्ज्वल आहे. मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य विस्तारलेले आहे. त्यामूळे पक्षाला आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सत्तास्थापनेपर्यंत बहुमत प्राप्त होईल, अशी आशा अनिल नाईक यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संसंर्गातून रूग्णांची संख्या वाढतच आहे. बळींचा आकडा कमी होत नाही. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास भाजप असमर्थ ठरले आहे. ही नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपाच्या नेत्यांनी राजीनामा देण्याचे सोडून कार्यकर्ते, पंचसदस्य व नगरसेवकांना फोडून नेण्याच्या कामात ते व्यस्त आहे. त्यामुळे सामान्य माणासाला भाजपाच्या या गलीच्छ राजकारणाची उबग आलेली आहे, असे मगो गटाध्यक्ष श्री. नाईक यांनी सांगितले.
भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर व माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या अलौकीक कार्याची जोड आणि मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांची जो पर्यंत जनसेवा अविरतपणे चालू असेल तो पर्यंत मगो पक्ष विधानसभेत आणि तळागाळातल्या सामान्यांच्या हृदयात अढळ असेल. भाजपाने त्याला संपवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी मगो पक्ष संपणार नसून उलट भाजपाच संपेल हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असे अनिल नाईक यांनी सांगितले.