नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नुकत्याच पार पडलेल्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँगेसचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवाच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी पक्षाने एका समितीची स्थापना केली आहे. या 5 जणांच्या समितीचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण करणार आहेत.
चव्हाण यांच्याशिवाय सलमान खुर्शिद, मनीष तिवारी, व्हिन्सेंट पाला आणि ज्योती मणी यांचा समावेश आहे. ही समिती आसाम, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळ येथील पक्षनेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पराभवाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आपल्या सूचनांचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करण्यास समितीला सांगण्यात आले आहे.
केरळच्या गेल्या चाळीसहून अधिक वर्षांच्या परंपरेनुसार तेथे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आघाडी बदलते. त्यामुळे यंदा काँग्रेसच्या आघाडीचे बहुमत येईल अशी आशा होती. तथापि, तेथे काँगेसचा मोठा पराभव झाला. आसाममध्येही काँगेसने बद्रुद्दि अजमल यांच्या पक्षाशी युती केल्याने मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण होऊन काँगेस आघाडीला लाभ होईल अशी अपेक्षा होती. तथापि, या राज्यात भाजपने रालोआतील इतर पक्षांच्या साहाय्याने पुन्हा बहुमत मिळवून 2016 च्या परिणामांची पुनरावृत्ती केली. परिणामी येथेही काँगेसला हार खावी लागली.
पुदुच्चेरी गमावले
पुदुच्चेरी या छोटय़ा केंद्रशासित प्रदेशात काँगेसची पूर्ण बहुमताची सत्ता होती. तथापि, निवडणुकीपूर्वी एक महिना काँगेसमधील अनेक आमदार फुटल्याने पक्ष अल्पमतात आला. मुख्यमंत्री नारायण सामी यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर येथे रालोआचे बहुमत आल्याने हे राज्यही काँगेसच्या हातून गेले. पश्चिम बंगालमध्ये 2016 च्या निवडणुकीत काँगेसला 45 जागा मिळाल्या होत्या. यंदा तेथे पक्षाच्या पदरी अक्षरशः भोपळा पडला. तामिळनाडूत पक्षाला द्रमुकशी युती केल्याने 18 जागा मिळाल्या आहेत. तथापि, तेथे द्रमुकला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळाल्याने काँगेसचा शब्द चालणार नाही, अशी स्थिती आहे. अशा तऱहेने या पाच पैकी कोणत्याही प्रदेशात पक्षाची डाळ यंदा शिजली नाही.
भविष्यावर परिणाम
या निवडणूक पराभवाचा काँगेसच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होऊन पक्षाची अधिकाधिक घसरण होण्याची चिंता कपिल सिबल या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा एकदा नेहरू-गांधी कुटुंब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही आत्मावलोकन समिती स्थापन करण्यात आली आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.









