वाघाच्या वर्षभराच्या देखभालीसाठी एक लाखाचा निधी सुपूर्द : संग्रहालयाचा विकासही करणार
प्रतिनिधी / बेळगाव
भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात नुकताच दाखल झालेल्या कनिष्का नावाच्या वाघाला गोल्याळी (ता. खानापूर) येथील प्राणीप्रेमी परशुराम निपाणीकर यांनी एका वर्षासाठी दत्तक घेतले आहे.
भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात तीन सिंह आणि दोन वाघ दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या वन्यप्राण्यांचा खर्च जास्त आहे. यामुळे वन्यप्राण्यांसाठी दत्तक योजना राबविण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून यापूर्वी गोल्याळी येथील वनपाल श्रीनाथ कडोलकर यांनी शौर्य नावाचा वाघ दत्तक घेतला आहे. त्या पाठोपाठ परशराम निपाणीकर यांनीदेखील वाघाच्या वर्षभर देखभालीसाठी एक लाखाचा निधी दिला आहे. याबाबतचे दत्तक प्रमाणपत्र निपाणीकर यांना सुपूर्द करण्यात आले आहे. प्राण्यांना दत्तक घेणाऱया व मदत करणाऱया प्राणीप्रेमींच्या नावांचा फलक लावण्यात येणार आहे. प्राणी संग्रहालयात वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी दत्तक योजना राबविण्यात येत आहे. एक महिन्यापासून पुढील कित्येक महिन्यांपर्यंत प्राणीप्रेमी प्राण्यांना दत्तक घेऊ शकतात. शिवाय जमा झालेल्या रकमेतून संग्रहालयाचा विकास साधता येणार आहे.