शिवसेना मालवण शहरप्रमुखांची मागणी
प्रतिनिधी / मालवण:
अवरुद्ध केलेली नौका आचरा बंदरामधून पळविल्यानंतर पुढील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.
14 नोव्हेंबर 2020 रोजी अल असीब-IND-MH-5-MM-132 ही नौका अवैधरित्या एलईडी मासेमारी करताना सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी), मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांनी पकडली. या बोटीवरील साहित्य जप्त करून ती आचरा बंदरामध्ये अवरुद्ध करून ठेवली असता, दरम्यानच्या काळात बोट मालक रियान युसुफ मुजावर (रा. आचरा) यांनी शासनाच्या ताब्यातील नौका परस्पर पळवून नेली. याला महिना उलटूनही मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र देण्यापलिकडे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमधून पुढील कारवाई पूर्ण करण्याकरिता भालेकर यांना बोलविले असता, बोट मालकाशी असलेले आर्थिक व्यवहार संबंधामुळे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करून 14 नोव्हेंबर रोजी अल हसीब ही अवैधरित्या एलईडी मासेमारी करताना पकडलेली नौका मालक रियान मुजावर यांनी पळवून नेऊन महिन्यानंतर सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला नाही. याबाबत गंभीर दखल मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी यांनी न घेता, हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे.