ऑनलाईन टीम/ पुणे :
कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे परवानाधारकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद झाले आहेत. अनेक कुटुंबांचे व्यवसाय बंद असल्यामुळे सर्व परवानाधारकांचे मार्च महिन्यापासून पुढील सहा महिन्यांपर्यंतचे शुल्क पूर्णपणे माफ करावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
शिवसेनेचे महापालिकेतील गटनेता पृथ्वीराज सुतार यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीला दिला आहे. महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागामार्फत बेरोजगार, गरीब, अपंग व्यक्तींना शहरात व्यवसाय करण्यासाठी परवाना दिला जातो. स्टॉल्स, पथारी, हातगाडी अशा स्वरूपात त्यांना महापालिकेकडून अधिकृत परवाने दिले जातात. त्यासाठी योग्य ते शुल्क महापालिकेकडून आकारले जाते. परवानाधारकांकडून आतापर्यंत नियमितपणे शुल्क भरण्यात येत आहे. मात्र, कोरोना संकट आणि टाळेबंदीमुळे परवानाधारकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.








