ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ परत सत्तेवर आले असून मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय. दरम्यान, गाझियाबादमधील लोणी येथून पुन्हा आमदार म्हणून निवडून आलेले नंदकिशोर गुर्जर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
गुर्जर त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी आमदार होताच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर नंदकिशोर गुर्जर यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नंदकिशोर यांनी निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त केले. यासोबतच त्यांनी येत्या पाच वर्षांत काय करणार, हे देखील सांगितलं. पण परवानगीशिवाय लोणीत एकही मांसाचे दुकान किंवा हॉटेल उघडणार नाही, असा इशाराही दिला.
दरम्यान, यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना या परिसरात मांसाचे एकही दुकान दिसू नये असा इशारा दिला. हे लोणीच्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे, असेही ते म्हणाले. लोणीत रामराज्य पाहिजे, म्हणून दूध, तूप, खा आणि दंडबैठका करा. पण परवानगीशिवाय लोणीत एकही मांसाचे दुकान किंवा हॉटेल उघडणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.