प्रतिनिधी/ दापोली
परळवरून माटवण मार्गे दापोलीला येण्यासाठी मध्यरात्री 11 वाजता सुटलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला रायगड जिल्हय़ातील माणगाव तालुक्यातील करंजे फाटय़ानाजीकच्या कलामजे पुलाजवळ अपघात झाला. यात चालक व वाहकासह दापोली व मुंबई येथील तब्बल 35 प्रवासी जखमी झाले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी कठडय़ाला आदळून पुलाच्या खाली उलटून अपघात झाल्याची माहिती माणगाव पोलिसांनी दिली. शनिवारी पहाटे 5 वाजता हा अपघात घडला.
दापोली तालुक्यातील उंबर्ले येथील रहिवाशी असणारे एसटीचे चालक देवेंद्र येलवे (33) व वाहक कमलाकर मिरझुलकर (43) हे परळ-माटवण मार्गे दापोली ही बस घेऊन येत होते. यावेळी गाडीत एकूण 44 प्रवासी होते. बहुतांश प्रवासी झोपेत होते. गाडी माणगाव येथील करंजे फाटय़ानजीक असणाऱया कलामाजे या अरूंद पुलाजवळ आली असता पुलाच्या समोरून दुसरी गाडी येताना चालकाला दिसली. यामुळे चालकाने गाडी नियंत्रणात आणण्यासाठी गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक न लागता गाडी चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. हा पूल अरूंद असल्याने गाडी पुलाच्या कठडय़ाला आदळून पुलाच्या खाली उलटली.
स्थानिकांनी पोलिसांना कळवून अपघातातील सर्वांना गाडीच्या बाहेर काढले. यात तब्बल 35 प्रवासी जखमी झाले. या सर्वांना माणगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच माणगावचे आगार व्यवस्थापक चेतन देवधर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. शिवाय त्यांनी सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी कर्मचाऱयांसह धावपळ केली. तसेच ज्यांच्यावर उपचार पूर्ण झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी परतण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसचीदेखील व्यवस्था केली. यातील स्वाती माने यांच्या नाकाला दुखापत झाली असल्याने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार मुंबई येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. 35 जखमींपैकी 30जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर केवळ 5जणांवर माणगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती देवधर यांनी दिली.
या अपघातात जखमी झालेल्यामध्ये चालक देंवेंद्र येवले व वाहक कमलाकर मिरझुलकर यांच्यासह स्वाती माने (46, म्हाळुंगे), वंदना जालगावकर (45, चिंचवळ), अमिता महाडीक (54, माटवण), अरूण महाडीक (61, माटवण), सावित्री पाटणे (78, विरार), विनया महाडीक (50, वडवली), लता जाधव (49, ठाणे), दशरथ मोरे (62, टांगर), सुधाकर कदम (45, लाटवण, ता. मंडणगड), सुनील साबळे (60, मुंबई), विमल जोंधळे (52, मुंबई), सुमंगल महाडीक (39, वडवली), सुभाष लिमये (65, मुंबई), संतोष मोरे (45, माटवण), किरण कदम (45, टांगर), प्रतिमा कदम (45, ठाणे), दाऊद मुरूडकर (78, टांगर), गणेश जालगावकर (50, नालासोपारा), सुमित्रा सायले (60, वणंद), नामदेव इंदूलकर (82, हातिप), रवींद्र इंदूलकर (52, हातिप), दीप्ती जाधव (40, शिरसोली), शेखर माने (55, मुंबई), विजय रूके (65, मुंबई), राकेश जाधव (40, शिरसोली), सानिका परब (43, शिरसोली), प्रकाश कदम (59, टांगर), रवींद्र गायकवाड (38, आपटी), सायली कदम (21, ठाणे), अविनाश जाधव (27, शिरसोली), सागर खसपोल (42, पाचाड) व संतोष साळवी (36, पाचवली) अशी आहेत.
यात चालक देवेंद्र येलवे यांच्या चेहऱयाला, हाताला व दातांना, तर वाहक कमलाकर मिरझुलकर यांच्या कंबरेला व पाठीला जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर माणगाव येथे उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत.
…तर मोठा अनर्थ घडला असता!
ही गाडी पुलाला ठोकर देऊन पुलाच्या खाली उलटी झाली. ती आणखी थोडी पुढे गेली असती तर थेट नदीच्या पाण्यात जाऊन पडली असती व मोठा अनर्थ ओढवला असता. या अपघतात गाडीची चारही चाके गाडीपासून वेगळी झाली. बहुतांश प्रवासी हे यावेळी झोपेत होते. तसेच अंधार असल्याने आधी कुणाला नेमके काय झाले व आपण कोठे आहोत हेच समजले नाही. शिवाय गाडीही दरवाजाच्या बाजूने कलंडली असल्याने कुणाला दरवाजातून बाहेर पडता आले नाही. शेवटी चालकाच्या समोरील काचा फोडून सर्वांना गाडीच्या बाहेर काढण्यात आले.









