अमर वांगडे / परळी :
परळी खोऱ्यातील जनता राजघराण्याशी नेहमीच प्रामाणिक राहिली आहे. काहीही झालं तरी राजगादीशी गद्दारी नाही हीच भूमिका वर्षानुवर्ष सुरू होती. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजेंचा परळी खोरे हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून आमदार शिवेंद्रराजेंचे येथे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी हा बालेकिल्ला शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून पोखरायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी अन् सेनेचा शिरकाव शिवेंद्रराजेंसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे परळी भागातील मतदार आगामी निवडणुकीत कोणाला कौल देणार याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षीय राजकारणात परळी भागाचा खुंटलेल्या विकासाला चालना मिळावी एवढीची अपेक्षा येथील नागरिकांची आहे.
सातारा-जावली मोठा विस्तारलेला मतदारसंघ असला तरी परळी खोरे हा मतदानात टर्निंग पॉईंट घेणारा भाग मानला जातो. या ठिकाणी महाबळेश्वरसारखेच किंबहुना त्याहून अधिक निसर्गसौंदर्य व विविधता पाहायला मिळते. मात्र पर्यटनक्षेत्र ‘जैसे थे’च अडगळीत आहे. भागात चार मोठी जलसंधारणाचे प्रकल्प असून येथील पुनर्वसनाचा प्रश्न असो किंवा धरणाच्या वर सरकून राहिलेल्यांना भौतिक सुविधांची वाणवाच आहे. धरणग्रस्त ग्रामपंचायतींची खाती गोठवल्याने गावांमध्ये शासनाच्या योजना राबवल्या जात नाहीत. तर पुनर्वसित ठिकाणांच्या समस्या या कित्येक वर्षांपासून तशाच आहेत. हेच हेरून शिवसेना व राष्ट्रवादीने या भागात तळ ठोकून भावनिक साथ दिली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नुकताच पक्षप्रवेश मेळावे आमदार व मंत्र्यांच्या हस्ते घेतल्याने भागातील बाबा गटाला गळती लागली. ही परिस्थिती अशीच राहिली तर सातारा-जावलीचा पुढील आमदार कोण होणार याबाबत सध्यातरी काही सांगता येणार नसल्याचे पक्के राजकारणी सांगत आहेत.
आ. शशिकांत शिंदेंनी स्वत: घातले लक्ष
परळी भागात कोणालाही घुसखोरी करण्याचे एवढे शक्य नव्हतं, मात्र शशिकांत शिंदे यांनी भागात लक्ष घातल्याने बाबा गटातील नाराज असलेल्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष प्रवेश झालेल्यांची सातत्याने चर्चा करून आगामी निवडणुकीच्या व्यूहरचना ह्या तयार केले जात आहेत. यामुळे या वेळी राष्ट्रवादी डोईजड होणार का? असाच प्रश्न निर्माण होत आहे.
परळीत सेनेची दमदार कूच
परळी भागात शिवसेना नावालाच उरली होती मात्र शिवसेना नेते नितीन बानुगडे पाटील व उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या प्रयत्नांनी कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा उभारी घेत आहे. भागात पोटतिडकीने प्रश्न मांडले जात आहेत तसेच ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने शिवसेनेची वाटचाल अनेकांना अडचणी निर्माण करणारीच आहे.
शिवेंद्रराजेंच्या चिंतेत वाढ
आमदार शिवेंद्रराजेंच्या बालेकिल्ला असणाऱया परळी खोऱयात शिवसेना-राष्ट्रवादीचा घुसखोरीने चिंतेत भर पडली आहे. भागातील नाराजांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच सर्व निवडणुकीसाठी शिवेंद्रराजेंना पुन्हा एकदा मोर्चे बांधण्याची गरज आहे. अन्यथा हे दोन पक्ष शिवेंद्रराजेंना डोईजड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









