स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर सात दिवस होम क्वारंटाईन
प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यामधून बेळगावात दाखल होणाऱया नागरिकांना 14 दिवस सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र परराज्यामधून येणाऱया नागरिकांची संख्या वाढत असल्याने क्वारंटाईन करण्याची डोकेदुखी प्रशासनाला झाली आहे. तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या स्वॅब तपासणीकरिता विलंब होत असल्याने सात दिवसात स्वॅब चाचणी करून निगेटिव्ह अहवाल आलेल्या नागरिकांना सात दिवसात क्वारंटाईनमुक्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
बेळगाव शहर व ग्रामीण भागात परराज्यांमधून येणाऱया नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. शहरात आतापर्यंत सातशेहून अधिक नागरिकांना सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. वसतिगृहे, शासकीय इमारती, हॉटेल अशा विविध ठिकाणी परराज्यातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पण त्याठिकाणी जागा अपुरी पडू लागल्याने एका खोलीत दोन ते तीन नागरिकांना ठेवण्यात येत आहे. मात्र नव्याने येणाऱया नागरिकांना खोलीत ठेवण्यास नागरिक आक्षेप घेत आहेत. त्यामुळे बेळगावात दाखल झाल्यानंतर पाच ते सात दिवसांत नागरिकांचे स्वॅब घेवून तपासणी करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना सरकारी संस्थेमधून मुक्त करण्यात येईल. त्यानंतर पुढील सात दिवस त्यांना होम क्वारंटाईन करण्याचा नवा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. या नव्या आदेशामुळे महापालिकेच्या अधिकाऱयावरील ताण कमी होणार आहे.
परराज्यामधून येणाऱया नागरिकांना सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्यास प्रारंभ करण्यात आले. मात्र क्वारंटाईन करण्यात आलेल्या अनेक नागरिकांचे स्वॅब अद्याप घेण्यात आले नाहीत. 14 दिवसांसाठी सरकारी संस्थेत क्वारंटाईन केल्यानंतर 10 ते 12 दिवसात स्वॅब घेऊन तपासणी करण्याची आवश्यकता होती. पण बहुतांश नागरिकांची चाचणी झाली नाही. परिणामी अनेक नागरिकांना 14 दिवसानंतरही क्वारंटाईन रहावे लागत आहे. त्यामुळे आता सात दिवसांच्या आत स्वॅब घेवून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच स्वॅब निगेटिव्ह आल्यास त्यांना क्वारंटाईनमुक्त करण्यात येणार आहे.









