अध्याय चौदावा
भगवंत म्हणाले, उद्धवा मी सगुण रूपात कसं असावं हे माझे भक्तच ठरवतात. माझ्या भक्तांना मी भक्तीमुळेच वश झालो आहे म्हणून रात्रंदिवस मी भक्तांपाशी सतत उभा असतो. त्यांच्यासाठी जन्म घेतो. कर्मशून्य असताना त्यांच्याकरिताच कर्म करतो. त्यांच्या शब्दासाठीच मी महान् पातक्मयांचा नाममात्राने उद्धार करतो.
इतकी भक्तीची सत्ता माझ्यावर चालते. भक्तीशिवाय मी कोणाच्याही हाती मुळीच लागत नाही. भक्तांच्या उपकाराने मी खरोखरच अगदी वाकून गेलो आहे. कारण, त्यांच्या उपकारांची परतफेड म्हणून मी जन्मरहित असलो तरी त्यांच्याकरिताच जन्म घेतो. मी कर्मशून्य आहे पण त्यांच्याकरिताच कर्म करतो. मी सर्वस्वी त्यांच्या आधीन असतो पण त्यांचे उतराई व्हावयास माझ्याजवळ गाठीला काहीच नसते. आता काहीतरी सटरफटर त्यांना दिले आहे, तेही तुला हळूच सांगून ठेवतो. भक्त हे माझ्यामुळेच सनाथ झाले आहेत. माझ्यामुळेच ते कृतकृत्य झाले आहेत. माझ्याच आनंदाने ते सर्वदा तृप्त झाले आहेत आणि आत्मज्ञानाने उचंबळून गेले आहेत. माझ्याच बळावर ते सर्व जगाला भारी झाले आहेत. ते घाव घातल्याशिवायच सृष्टि छेदून टाकतात. माझ्या सामर्थ्यामुळेच त्यांच्या दृष्टीसमोर कळिकाळ येऊ शकत नाही. माझ्यामुळेच ते त्रैलोक्मयात कोणाचीही परवा करीत नाहीत. माझ्यामुळेच ते देहामध्ये विदेहत्वाने राहतात. माझ्याच बळाने त्यांनी प्रळयकाळही पिऊन टाकला पहा ! माझ्याच बळाने त्यांनी जन्ममरण नष्ट केले. माझे भजन करून ते सनातन ब्रह्मस्वरूप झाले आहेत. पण हेसुद्धा त्यांना मी दिलेले नाही. तर माझ्या भजनाच्या सामर्थ्यानंच त्यांनी ते मिळवले आहे. त्यांच्यापुढे माझे काही चालत नाही. माझे सर्वस्व माझ्या भक्तांनी लुटून नेले आहे. त्यांनी मला विकतच घेतले आहे असे म्हणालास तरी चालेल. भगवंतांचं हे मनोगत गदिमांनी बरोबर ओळखलं आहे म्हणून ते त्यांच्या गीतात म्हणतात, नाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम। कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी,
जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरिनाम, विकत घेतला श्याम। बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा, हाच तुक्मयाचा विठ्ठल आणि
दासाचा श्रीराम । विकत घेतला श्याम
जितुके मालक, तितकी नावे, हृदये तितकी याची गावे, कुणी न ओळखी तरीही याला, दीन अनाथ अनाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम। भगवंत पुढं म्हणाले, भक्तांनी भजनाच्या भक्तीसामर्थ्याने मला अजिंक्मयालाही जिंकिलं आहे. आणि जिंकून मला अगदी वश करून ठेवले आहे. अरे माझे आत्मपदही माझ्या भक्तांनीच नेले ! अशा प्रकारे माझ्या आत्मपदाची सत्ता जरी माझ्या भक्तांच्या हातात असली, तरी धनीपणा माझ्याकडेच ठेवून ते माझ्या भक्तीमार्गाला बिलगून राहिले आहेत. त्या माझ्या भक्तीची पवित्रता ऐकतांना तुला आश्चर्य वाटेल, पण मला सांगतांना कोणताच संशय नाही. भक्तीचा खरा महिमा ऐक. लोकव्यवहारातील दांभिक प्रति÷ा सोडून शुद्ध भावार्थाने जो माझ्या भजनी लागला, तो जातीने हीन असला, तरी तो मला अत्यंत पूज्य आहे. केवळ अमंगळ अशी अस्वले आणि माकडे किंवा ताक पिणारी व रानात भटकणारी गवळय़ांची पोरे, तीसुद्धा मी पूज्य मानिली. जातीने हलकेपणाला असला आणि भक्तीभावाने महत्त्वाला चढला, तो मत्स्वरूपाला पोचला व त्रैलोक्मयात पूज्य झाला असे समजावे. विदुर हा दासीपुत्र होता. पण तो भक्तीमुळेच माझा आवडता झाला. म्हणून परमार्थात भाव हाच मुख्य आहे. जातीचा अभिमान काही उपयोगी पडत नाही. माझी प्राप्ती व्हावयाला भक्ती हीच श्रे÷ आहे. जाती श्रे÷ नाही. म्हणूनच सर्वाच्या आधी मी वनचरांचा (माकडे, अस्वले वगैरेंचा) उद्धार केला पक्ष्यांमध्ये अत्यंत निंद्य असलेल्या गिधाड जटायुचा मी उद्धार केला. मी धर्मव्याध नावाचा अंत्यज उद्धरला. कारण माझ्या ठिकाणी त्याची शुद्ध भक्ती होती.
विश्वनाथ छत्रे