ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह स्वत: देखील अडचणीत आले आहेत. परमबीर यांच्यावर मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये परमबीर सिंह यांच्यासह एकूण आठ जणांची नावे असून यामध्ये सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरणात पोलिसांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर परमबीर सिंग यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणात सध्या देशमुख यांची ईडी व सीबीआय चौकशी सुरू आहे. मात्र, त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.
खंडणी प्रकरणात पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120(ब), 166, 177, 181, 193, 182, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111आणि 113 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.