48 तासांमध्ये सीबीआयसमोर चौकशीसमोर होणार उपस्थित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे माजी गृहमंत्री आणि सध्या अटकेत असणारे अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीची खंडणी वसूल केल्याचा आरोप पत्राद्वारे करणारे परमबीरसिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने अटक होण्यापासून संरक्षण दिले आहे. आपण भारतातच असून कोठेही पळून गेलेलो नाही. तसेच सीबीआयसमोर येत्या 48 तासांमध्ये उपस्थित होऊन चौकशीत सहकार्य करु, असे प्रतिपादन आपल्या वकीलाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला केल्यामुळे त्यांना हा दिलासा देण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेले वर्षभर परमबीर सिंग हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत आहे. प्रारंभी त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाची मर्जी होती. त्यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी महाविकास आघाडी सरकारनेच केली होती. तथापि, नंतर त्यांना आयुक्तपदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले. या आरोपांमुळे आता परमबीर सिंग यांचीही चौकशी केली जात आहे. ते गेले चार महिने अज्ञातवासात होते. ते परदेशी पळून गेल्याच्या अफवा उठविण्यात आल्या होत्या.
भारतातच आहे
तथापि, सोमवारी त्यांचे वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयात त्यांच्या वतीने युक्तीवाद करताना ते कोठेही पळून गेले नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या जीवाला धोका असल्याने ते अज्ञात स्थळी लपलेले आहेत. ते लवकरच सीबीआयच्या कार्यालयात उपस्थित राहून चौकशीला सहकार्य करतील असे न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर त्यांना न्यायालयाला अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले. लवकरच ते सीबीआय कार्यालयात जाणार आहेत.
महाराष्ट्र सरकारचा युक्तीवाद महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरायस खंबाटा यांनी युक्तीवाद केला. परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन रीट आवेदने सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. या रीट आवेदनांवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयासंबंधात धादांत खोटे आरोप सर्वोच्च न्यायालयात केले आहेत, असे प्रतिपादन खंबाटा यांनी पेले. मात्र, याचा प्रतिवाद सिंग यांचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात पत्राद्वारे पर्दाफाश केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने अनेक प्रकरणे दाखल केली आहेत. महाराष्ट्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे, असा प्रत्यारोप त्यांनी केला. परमबीर सिंग चौकशीला सहकार्य करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.









