ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सध्या बेल्जियममध्ये आहेत, असा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
निरुपम यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘परमबीर सिंग हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. त्यांनी मंत्र्यावर खंडणी वसूलीचा आरोप होता. ते स्वत: पाच गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असून मागील काही महिन्यांपासून गायब आहेत. ते सध्या बेल्जियममध्ये आहेत, असे समजते. ते बेल्जियमला कसे गेले? त्यांना सेफ पॅसेज कोणी दिला? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना आणू शकत नाही का?,’ असे निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधात देखील आरोप झाले. त्यावरून ठाणे कोर्टाने देखील परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले होते. तेव्हापासून सिंग फरार आहेत.








