कुर्डुवाडी / प्रतिनिधी
लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना घेऊन विशेष रेल्वेगाडी कुर्डुवाडी हून लखनऊ उत्तरप्रदेशकडे आज गुरूवारी दुपारी २ वा रवाना झाली. सुमारे १२३६ नोंदणीकृत प्रवासी या विशेष रेल्वे गाडीने उत्तरप्रदेशकडे रवाना झाले. जिल्ह्यातील या मजुरांना महामंडळाच्या विशेष बसगाड्यांमधून तसेच काही खासगी वाहनातून कुर्डुवाडी रेल्वेस्थानकावर पोहचवण्यात आले. याठिकाणी सर्व प्रवास्यांचे स्थानकात आल्यानंतर स्क्रिनिंग टेस्ट घेतली गेली.
गाडी स्थानकात अाल्यानंतर आरक्षित बोगीप्रमाणे या नोंदणीकृत प्रवास्यांना २२ बोगींचीही या विशेष गाडीत प्रत्येकी ८० प्रवासी क्षमता असलेल्या एका बोगीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सुमारे ५४ प्रवासी एका बोगीतून बसविण्यात आले.
यासाठी प्रती प्रवासी ६५५ रुपये याप्रमाणे १२३६ प्रवास्यांचे प्रवासी भाडे म्हणून तब्बल आठ लाख ९ हजार ५८० रुपये महाराष्ट्र शासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे जमा करण्यात आले आहे. सदरची रेल्वे ही दौंड, भुसावळ, खांडवामार्गे नॉनस्टॉप लखनऊ येथे जाणार आहे. कुर्डुवाडी येथून आज दुपारी दोन वाजता ही रेल्वे सुटल्यानंतर लखनऊ स्टेशनवर शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोहोचेल.
यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम,उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.विशाल हिरे ,तहसीलदार राजेश चव्हाण,गटविकास अधिकारी डाॅ. संताजी पाटील,नगराध्यक्ष समीर मुलाणी मुख्याधिकारी कैलास गावडे,वैद्यकीय अधिकारी डाॅ.संतोष अडागळे,पो.निरीक्षक रवींद्र डोंगरे,सहा पो.निरीक्षक चिमणाजी केंद्रे आदी उपस्थित होते.
अशी आहे प्रवाशांची संख्या…
माढा – ३२१
माळशिरस – २९०
सांगोला – २३२
मोहोळ – १८६
बार्शी – ९५
उत्तर सोलापूर – ५५
दक्षिण सोलापूर – ३६
करमाळा – १४
अक्कलकोट- ४
मंगळवेढा – ३









