मजूर वस्त्यांमध्ये जागृती मोहीम राबवा : सुदिन ढवळीकर यांची मागणी
प्रतिनिधी / फोंडा
बांदोडा पंचायत क्षेत्रातील शापूर भागात राहणारे परप्रांतीय मजूर व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास प्रवृत्त करावे. एका महिन्यात त्यांनी लसिकरण करुन न घेतल्यास त्यांचे रेशन कार्ड व मतदान ओळखपत्र रद्द होणार अशी ताकिद द्यावी, अशी मागणी स्थानिक आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. चिरपुटे भागात रविवारी लसिकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
शापूर भागात किमान 350 परप्रांतीय मजूर वास्तव्यास आहेत. त्यापैकी दहा टक्केही लोकांनी अद्याप लस घेतलेली नाही. या मजूर वस्तीमधील महिला फोंडा शहर व आसपासच्या भागात घरकामासाठी जातात. विविध कामानिमित्त पुरुष मंडळींचा इतरांशी संपर्क येतो. त्यांच्यामुळे इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा वाढता धोका आहे. कोराना प्रतिबंधक लसिबाबत या मजूर लोकांमध्ये गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करुन ते लस घेण्यास प्रवृत्त होतील यासाठी जागृती करण्याची गरज आमदार ढवळीकर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडय़ाचे सरपंच राजेश नाईक, वामन नाईक, कवळेचे पंचसदस्य मनोज बोरकर, दुर्भाट आगापूरचे उपसरपंच सद्गुरु गावडे हे उपस्थित होते.
मोन्सूनपूर्व कामांसाठी पंचायतींना तात्काळ निधी पुरवा
येत्या 31 मे पर्यंत मोन्सूनचा पाऊस गोव्यात दाखल होणार आहे. त्यापूर्वी पंचायत क्षेत्रातील गटारकामे व अन्य साफसफाईची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. निधी अभावी ही कामे रखडली असून पंचायतींना सरकारने तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा. यापूर्वी मोन्सूनपूर्व सफाईची कामे बांधकाम खात्यामार्फत केली जायची. सरकारने ती पंचायतीकडे सुपूर्द केली आहेत. अकरा प्रभांगाच्या मोठय़ा पंचायतींना किमान अडीच ते तीन लाख, नऊ प्रभागांच्या पंचायतींना दोन लाख तर सात प्रभागांच्या पंचायतींन एक ते दीड लाख रुपये निधी पुरवण्याची मागणी सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. मलनिस्सार प्रकल्प व अन्य कामांमुळे खोदलेल्या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण अद्याप झालेले नाही. पावसाळय़ापूर्वी तुंबलेली गटारे उपसली न गेल्यास उरलेले रस्तही उखडून जातील, असेही सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.









