माजी सरपंच अजय लोलयेकर यांचा ठपका, लोलये पंचायतीवर कचरा हटविण्याची पाळी
प्रतिनिधी / काणकोण
गोव्याच्या विविध भागांमध्ये कामासाठी आलेले कर्नाटकातील कामगार आणि अन्य नागरिकांनी कोविड-19 च्या साथीमुळे आपल्या गावी परतण्यासाठी घाई केली आहे ही जरी सकारात्मक बाब असली, तरी त्याचा त्रास लोलये-पोळे पंचायतीने का सोसावा, असा सवाल लोलये-पोळे पंचायतीचे माजी सरपंच अजय लोलयेकर यांनी केला आहे. अशा कामगार व अन्य नागरिकांनी येऊन माड्डीतळप पठार तसेच पोळे चेकनाका परिसर गलिच्छ करून टाकला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्या भागांमध्ये या नागरिकांचे वास्तव्य राहिलेले आहे त्या ठिकाणांहून परस्पर त्यांना कर्नाटकात पोहोचवावे, अशी मागणी लोलयेकर यांनी केली आहे.
7 मेपासून मोठय़ा संख्येने सुरुवातीला पोळे चेक नाका व त्यानंतर माड्डीतळप या ठिकाणी कर्नाटकातील कामगार व अन्य नागरिकांना गोव्यातील वाहनांतून सोडण्यात आले. पोळे चेकनाक्यावरून सुटून माजाळी चेकनाक्यावर प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले सोपस्कार पूर्ण होईपर्यंत एक-एक दिवस या कामगारांना वाट पाहत थांबावे लागले. या कालावधीत पोळे चेकनाका तसेच माड्डीतळप या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या आणि अन्य कचऱयाचा ढीग साचला. हा सारा कचरा काढण्याचे काम लोलये पंचायत मागच्या आठ दिवसांपासून करत आहे. कोणाच्या म्हशी व कोणाला उठाबशी अशी अवस्था या पंचायतीची झालेली आहे, असे लोलयेकर यांनी म्हटले आहे.
कचरा का उचलायचा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारतचा नारा 100 टक्के यशस्वी करण्याचे काम आतापर्यंत लोलये पंचायतीने केलेले आहे. रस्त्याच्या बाजूचा कचरा पंधरा दिवसांपूर्वी काढण्यात आला होता. अशा परिस्थितीत वरील कचरा आम्ही का उचलावा, असा संतप्त सवाल लोलयेकर यांनी केला आहे. काणकोण तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यातच हे परराज्यांतील नागरिक माड्डीतळप आणि अन्य भाग अस्वच्छ करण्याचे काम करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी आम्ही सांभाळायची आणि दाटीवाटीने राहणाऱया या कामगारांना मात्र कोणीच विचारत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गोव्यात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. हे रुग्ण स्थानिक आहेत की, बाहेरचे हा प्रश्न नाही. या ठिकाणी आलेला एखादा कामगार कोरोनाग्रस्त असेल, तर त्याचे परिणाम आम्ही का म्हणून भोगायचे, असा सवाल लोलयेकर यांनी केला आहे. याबाबतीत आपण मामलेदार विमोद दलाल यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही हुकुमाचे ताबेदार अशा शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले, असे लोलयेकर यांनी सांगितले. सदर परप्रांतीय कामगार व अन्य नागरिकांना पोळे चेकनाक्यावर थांबा न देता गोव्याच्या विविध भागांतून आलेल्या बसेस सरळ माजाळी चेकनाक्यापर्यंत न्याव्यात. कर्नाटकातील बसेस माड्डीतळपपर्यंत येऊ शकतात, मग गोव्यातील बसेस माजाळीपर्यंत का जाऊ शकत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे. या संकटातून आमची सुटका करावी, अशी मागणी लोलयेकर यांनी केली आहे.









