प्रतिनिधी/ पणजी
कोरोना लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगारांना गोवा पोलिसांनी आधार दिला आहे. राज्यातील विविध निवासीगृहात या कामगारांची सोय करण्यात आली असून पोलीस त्यांना अत्यावश्यक वस्तू पुरवित आहेत. बुधवारी सुमारे 200 कामगारांची पोलिसांनी व्यवस्था केले आहे.
दिवसेनदिवस वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसवर आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारला आहे. गोव्यातील या कामगारांनी आपल्या गावी परतण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सगळीकडेच लॉकडाऊन असल्याने ते अडकून पडले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱया या कामगरांना लॉकडाऊन मुळे काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. या कामगारांना सध्या गोवा पोलीस मदत करीत असल्याचे उपअधीक्षक ऍड्वीन कुलासो यांनी सांगितले आहे. राज्यातील पोलीस आपल्या रोजच्या डय़ुटी बरोबरच माणुसकीच्या भावनेतून गोव्यात अडकून पडलेल्या कामागारांनाही सहकार्य करण्याचे काम करीत असल्याचे कुलासो यांनी सांगितले.
उत्तर गोवा अधीक्षक उत्कृष्ट प्रसन्नू, उपअधीक्षक ऍडवीन कुलासो हे जातीनीशी ठिकठिकाणी फिरून कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. अधीक्षक प्रसन्नू यांनी उत्तर गोव्यातील सर्व पोलीस स्थानकातील निरीक्षकांना आदेश जारी केला आहे की, ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत असे कामगार असतील आणि लॉकडाऊनमुळे त्यांची उपासमारी होत असेल तर त्यांना अन्न धान्यचा पुरठा करा तसेच ज्यांना रहाण्याची व्यवस्था नसेल तर त्यांना गोवा राज्य निवासीगृहात रहाण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. आत्ता पर्यंत कळंगुट, आगरवाडा, परबवाड, गौरववाडा, पेडे, म्हापसा या भागातील कामगारांना अन्न धान्य पुरविण्यात आले आहे. सुमारे 200 कामगारांना गोवाराज्य निवासी गृहात हलविण्यात आले आहे.
पोलिस खात्याच्या या कामात राज्यातील काही समाज सेवकही सढळहस्ते मदत करीत असल्याचे कुलासो यांनी सांगितले. इसाक फर्नांडिस या हॉटेल मालकाने 180 लोकाना सकाळच्या वेळचा नाश्ता तसेच दुध व अन्न पुरविले आहे. राज्या सध्याची स्थिती ही आणिबाणीची असल्याने गरजू लोकांना मदत करण्यासाठी पोलीस खात्याबरोबरच अनेक समाज सेवकांनी सहकार्याचे हात पुढे केले आहे. रोजंदारीवर काम करून आपले कुटुंब चालविणाऱया लोकांवर लॉकडाऊन मुळे उपासमारीची पाळी आली आहे. काम नसल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधनही बंद झाले आहे. यामध्ये परप्रांतीय लोकांबरोबरच काही स्थानिक लोकांचाही समावेश आहे. अशा लोकांना पोलीस सहकार्य करीत आहे. स्थानिक लोकांच्या घरापर्यंत अन्न धान्य कसे पोचते करता येईल याच्याकडे पोलीस जातीन लक्ष देत असून ज्या परप्रांतीय कामगारांना निवासाची सोय नाही अशा लोकांना गोवा राज्य निवासीगृहात व्यवस्था केली जात आहे.









