मिरज / प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्या आणि घरी जाण्याची ओढ लागलेल्या जिह्यातील सुमारे 1200 परप्रांतीय कामगारांना घेऊन दि. १० रोजी संध्याकाळी त्यांच्या स्वगृही रवानगी केली जाणार आहे. मिरज जंक्शनवरुन आज रविवारी रात्री आठ वाजता श्रमिक एक्सप्रेस ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार असून, ही गाडी उत्तर प्रदेश येथील मजूरांना घेऊन जाणार आहे. अर्ज केलेल्या कामगारांनाच ही रेल्वे घेऊन जाणार आहे. या मजूरांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. तब्बल 30 तासांचा प्रवास असल्याने या रेल्वे गाडीत जेवणखाण, फिजीकल डिस्टन्स, सॅनिटायझर, हॅन्डवॉश व आरोग्यबाबतची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पुणे जंक्शन वगळता ही विशेष रेल्वे उत्तर प्रदेशपर्यंत विनाथांबा धावणार आहे.
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने गेल्या दीड महिन्यांपासून उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. मजूरांना फटका बसला आहे. औद्योगिक वसाहती, कंपन्या, बांधकाम व्यवसाय बंद असल्याने मजूरांवर उपासमारी आली आहे. सांगली जिह्यात उत्तर प्रदेशसह इतर प्रांतातील मजूरांची संख्या लक्षणीय आहे. हे कामगार विविध कंपन्यांमध्ये काम करीत होते. लॉकडाऊनळे जिह्यातील सर्वच उद्योग कुलूपबंद झाले आहेत. त्यामुळे परप्रातीय कामगारांचे हाल होत आहे. कामधंदा नाही, पैसा नाही यामुळे संकटात सापडलेल्या कामगारांना घरी जाण्याची ओढ लागली होती. काही कामगार लॉकडाऊन काळात पायी चालत आपापल्या राज्यांकडे रवाना झाले आहेत. तर काही कामगारांनी स्थानिक प्रशासनाकडे घरी जाण्याची व्यवस्था करण्यासाठी विनंती केली आहे. दरम्यान, रेल्वे जंक्शनवर इतर प्रवाशांनी गर्दी नये. उत्तर प्रदेशाकडे जाणाऱ्या प्रवाशांकडे पस देण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे पस आहेत, त्यांनीच रेल्वे जंक्शनवर यावे. सोशल डीस्टनचे पालन करावे. तोंडाला मास्क लावूनच स्थानकात प्रवेश करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

श्रमिक एक्सप्रेस सुरू करण्यासाठी स्थानिक रेल्वे संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी केंद्र शासनाने श्रमिक एक्सप्रेस सुरू केली आहे. राज्यातील विविध जिह्यांमधून ही श्रमिक एक्सप्रेस सोडण्यात येत आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिह्यातील परप्रांतीय कामगारांना उत्तरप्रदेशकडे घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर ते गोरखपूर असा नियोजित प्रवास होता. मात्र, तो रद्द करुन आता मिरज ते गोरखपूर ही विशेष श्रमिक एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. सांगली, कोल्हापूर जिह्यातील सुमारे 1200 परप्रांतीय मजूरांनी नोंदणी केली असून, हे सर्व कामगार मिरज जंक्शनवर दाखल होत आहेत. आज रविवारी रात्री आठ वाजता ही रेल्वे गाडी सुटणार आहे. विशेष म्हणजे पुणे जंक्शन वगळता ही रेल्वे गाडी गोरखपूरपर्यंत विनाथांबा धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून साडेनऊ लाखांची मदत
मिरज जंक्शनवरुन उत्तरप्रदेशकडे रवाना होणाऱ्या मजूरांना कृषी राज्यमंत्री नामदार विश्वजीत कदम यांनी साडेनऊ लाख रुपयांची मदत दिली. बेरोजगारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मजूरांना स्वगृही परतल्यानंतर कुटुंबाचा उरनिर्वाह करण्यासाठी या मदतीची विभागणी करुन मजूरांना मदत वाटप केली जाणार आहे. विश्वजीत कदम यांनी सदरची मदत रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. ऐन संकटाच्या काळात विश्वजीत कदम हे देवदूत म्हणून परप्रांतीय मजूरांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.








