‘फेसबुक’नं ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आता त्यांच्यामागोमाग रांगेत उभी झालीय ती ‘मायक्रोसॉफ्ट’…दुसऱया बाजूनं ‘व्होडाफोन आयडिया’मध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी ‘गुगल’ इच्छुक असल्याचं वृत्त झळकलंय…या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांचा हिस्सा आपल्या खिशात घालण्यासाठी दिग्गज परदेशी आस्थापनांमध्ये चाललेल्या शर्यतीवर दृष्टिक्षेप…

भारताच्या औद्योगिक विश्वात सध्या चाललीय एक जोरदार शर्यत…आपल्या देशातील दिग्गज कंपन्यांत हिस्सा खरेदी करण्यासाठी जगभरातील नामवंत आस्थापनं, ‘प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स’ अत्यंत उत्सुक असून त्यांनी भारतीय कंपन्यांना धडक देण्यास यापूर्वीच प्रारंभ केलाय…या खेळात प्रवेश मिळविण्याठी आता तयारी सुरू केलीय ती अमेरिकेचं अजस्त्र आस्थापन ‘अल्फाबेट’च्या विश्वविख्यात ‘गुगल’नं…या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी ‘रिलायन्स जिओ’ व ‘सर्च जायंट’ ‘गुगल’ यांच्यातील स्पर्धा उद्योग जगतातील प्रत्येकाला खात्रीनं आपल्या दिशेनं खेचणार…
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘गुगल’चा विचार चाललाय तो ‘व्होडाफोन आयडिया’मधील्ा अल्प हिस्सा खिशात घालण्याचा (त्यानंतर तसा कसलाच प्रस्ताव कंपनीसमोर आलेला नाही असं स्पष्टीकरण ‘व्होडाफोन आयडिया’नं दिलेलं असलं, तरी पुढं सदर वृत्त खरं ठरल्यास अजिबात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही)…सध्या ब्रिटनची ‘व्होडाफोन’ नि भारतातील ‘आदित्य बिर्ला ग्रुप’ यांनी संयुक्तरीत्या पाया घातलेला दूरसंचार उद्योग जिवंत राहण्यासाठी अक्षरशः धडपडतोय…‘फायनान्शियल टाईम्स’नुसार ‘अल्फाबेट’चा विचार चाललाय तो 5 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा. ‘जिओ’नं ‘भारतीय टेलिकॉम विश्वा’ला नवीन दृष्यांचं दर्शन घडविल्यानंतर ‘व्होडाफोन आयडिया’ची स्थापना करण्यात आली, परंतु हे पाऊल अगदी पहिल्या दिवसापासून अपयशीच ठरलं. सध्या आस्थापनाला दूरसंचार खात्याला अनेक वर्षं न दिलेली रक्कम छळतेय. कंपनीनं सरकार अन् सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आधार देण्याची विनंती केलीय…
सर्वोच्च न्यायालयानं ‘ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू’संबंधी (एजीआर) ऑक्टोबर, 2019 मध्ये ‘व्होडाफोन आयडिया’ला आदेश दिला तो कोटय़वधी रुपयांची थकबाकी चुकती करण्याचा…जर ‘गुगल’ला हिस्सा खरेदी करणं जमलं, तर त्यांची गाठ पडेल ती अमेरिकेच्याच ‘फेसबुक’शी. मार्क झकेरबर्गच्या कंपनीनं ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’मध्ये 9.99 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय…‘फेसबुक’ नि अन्य ‘प्रायव्हेट इक्विटी’ गुंतवणूकदारांनी (‘सिल्व्हर लेक’, ‘व्हिस्टा इक्विटी’, ‘जनरल ऍटलांटिक’, ‘केकेआर’) ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या 17.12 टक्के हिश्श्यासाठी सुमारे 10 अब्ज डॉलर्स ओतलेत…‘व्होडाफोन आयडिया’च्या डोक्यावर सुमारे 58 हजार कोटी रुपयांचाr धारदार तलवार लोंबकळतेय अन् त्यामुळं ‘गुगल’चा आधार मिळाल्यास त्यांना प्रवास करणं सोपं होईल…
दरम्यान, अन्य एका वृत्तानुसार दिग्गज ‘मायक्रोसॉफ्ट’ ही ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’मध्ये 2.5 टक्के हिस्सा सुमारे 2 अब्ज डॉलर्सना खरेदी करणार असल्याचं आणखी एक वृत्त प्रसिद्ध झालंय. हे दोन्ही व्यवहार पूर्ण झाल्यास भारतात दर्शन घडेल ते अक्षरशः रंगतदार लढतीचं…खेरीज सौदी अरेबियाचा ‘सोव्हरिन वेल्थ फंड’ ‘जिओ’मध्ये 1 ते 2 टक्के हिस्सा खरेदी करू शकतो अशी चर्चा चाललीय. त्याचप्रमाणं अबुधाबीची ‘मुबादला’ ही सरकारी गुंतवणूक कंपनी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’मध्ये 1 अब्ज डॉलर्स ओतू पाहत असून त्या दिशेनं बोलणी सुरू देखील झालीत…हिश्श्यांची विक्री करण्याचा असा सपाटा लावण्यात आलाय तो मुकेश अंबानींच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’नं आपल्या डोक्यावरील तब्बल 44 अब्ज डॉलर्स कर्जाचा भार 2021 च्या मार्चपर्यंत शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट ठेवल्यानं…
काही दिवसांपूर्वी ‘भारती एअरटेल’नं ‘ब्लॉक डिल्स’च्या साहाय्यानं 2.75 टक्के हिस्सा विकून 8 हजार 400 कोटी रुपयांची कमाई केलीय…‘गुगल’नं देखील यंदाच्या जानेवारीत सुनील मित्तल यांच्या आस्थापनासमवेत भागीदारी करून आपल्या ‘जी सूट’ सेवा त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याहेत. अमेरिकी कंपनीचं ‘एअरटेल’बरोबरचं नातं गेल्या काही वर्षांत चांगलंच दृढ बनलंय…तरीही 32.9 कोटी ग्राहक पदरी असलेल्या ‘व्होडाफोन आयडिया’मध्ये हिस्सा खरेदी करण्याच्या दृष्टीनं ‘गुगल’ पाऊल पुढं टाकणार असं बहुतेक विश्लेषकांना वाटतंय…

अन्य एका घडामोडीनुसार, भारताला 2019-20 आर्थिक वर्षात 73.5 अब्ज डॉलर्स ‘एफडीआय’नं (थेट विदेशी गुंतवणूक) धडक दिलीय…‘कंप्युटर’, ‘हार्डवेअर’, ‘सॉफ्टवेअर’, ‘टेलिकॉम’ आणि ‘हॉटेल’ व ‘टुरिझम’ या क्षेत्रांनी दमदार कामगिरी नोंदविलीय, पण सेवाक्षेत्राला मात्र अनपेक्षितरीत्या धक्का बसलाय…2013-14 आर्थिक वर्षात नवी दिल्लीला दर्शन घडलं होतं ते 36 अब्ज डॉलर्सचं. त्या आकडय़ाशी तुलना केल्यास ‘थेट विदशी गुंतवणूक’ सहा आर्थिक वर्षांत दुप्पट वाढलीय…भारताचे उद्योगमंत्री पियूश गोयल यांच्या मते, त्यामुळं नव्या नोकऱयांच्या निर्मितीला साहाय्य मिळेल…2020-21 आर्थिक वर्षात ‘रिलायन्स’ आणि ‘सौदी अराम्को’ अन् ‘रिलायन्स’ नि ‘ब्रुकफिल्ड’ यांच्यात मोठे करार होण्याची शक्यता असल्यानं सकारात्मक वातावरणाची निर्मिती झालीय…
परदेशातल्या गुंतवणूकदारांचं आवडतं ठिकाण म्हणून महाराष्ट्रानं मान मिळविलाय, तर दुसरं स्थान पटकावलंय ते कर्नाटकनं…देशांचा विचार केल्यास सतत दुसऱया वर्षी सिंगापूरनं 14.7 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह प्रथम क्रमांक मिळविलाय (10 टक्क्यांची घट). मॉरिशसनं 8.2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीय, तर नेदरलँड्सनं 6.5 अब्ज डॉलर्सची (गेल्या आर्थिक वर्षाहून 1.7 पटींनी अधिक) !
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या ‘अनप्रेडिक्टेबल’ स्वभावाचं दर्शन पुन्हा एकदा घडविलंय…त्यांनी ‘ऍपल’ व अन्य कंपन्यांना चीनमधून भारत वा आयर्लंडच्या दिशेनं न जाण्याचा खणखणीत इशारा दिलाय. आस्थापनांनी महासत्तेच्या भूमीकडे प्रवास न केल्यास तोंड द्यावं लागेल ते नवीन करांना…ट्रंपनी ‘फॉक्स बिझनेस न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय, ‘ऍपलनं म्हटलंय की त्यांना भारतात जायचंय. आस्थापनाची बीजिंगऐवजी तिथं काही उत्पादनांची निर्मिती करण्याची इच्छा असली, तरी येऊ घातलेल्या वर्षांचा विचार केल्यास त्यांचं धोरण आम्हाला मान्य नाही. आम्ही इतर काही राष्ट्रांप्रमाणं उदार धोरणांचा स्वीकार केला, तर ‘ऍपल’ 100 टक्के उत्पादनांची निर्मिती खात्रीनं करणार ती अमेरिकेत, पण आम्हाला ते मान्य नाहीये. मात्र मला ‘मॅन्युफेक्चरिंग’ला पुन्हा अमेरिकेत आणायचंय…‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार, ‘ऍपल’नं निर्णय घेतलाय तो येऊ घातलेल्या भविष्यात चीनऐवजी नवी दिल्लीला मोठय़ा प्रमाणात महत्त्व देण्याचा. कारण ‘कोरोना’नं धडक दिल्यानंतर कित्येक ‘टेक’ कंपन्यांच्या ‘सप्लाय लाईन्स’वर जोरदार परिणाम झालाय आणि त्यांनी तेथून पळण्यास सुरुवात केलीय!
‘एफडीआय’चा प्रवाह
| आर्थिक वर्ष | थेट विदेशी गुंतवणूक |
| 2015 – 16 | 55.6 अब्ज डॉलर्स |
| 2016 – 17 | 60.2 अब्ज डॉलर्स |
| 2017 – 18 | 61 अब्ज डॉलर्स |
| 2018 – 19 | 62 अब्ज डॉलर्स |
| 2019 – 20 | 73.5 अब्ज डॉलर्स |
– राजू प्रभू









