बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी रविवारी सांगितले, की परदेशात जाणाऱ्या व्यक्तींचे २२ जून रोजी लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षणासाठी प्रदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे लोक आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे.
दरम्यान २२ जून रोजी शहरातील सेंट्रल कॉलेजच्या आवारात लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली आहे. यापूर्वी, जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याच ठिकाणी प्रथम मोहीम राबविण्यात आली तेव्हा सुमारे १,५०० लोकांना लस दिली होती.
तसेच याआधी कर्नाटकच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने एक परिपत्रक काढून परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस २८ दिवसानंतर देण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना या अंतर्गत लस घेण्यास परवानगी दिली जाईल त्यामध्ये परदेशात प्रवास करणारे विद्यार्थी, कामासाठी परदेशात जाणारे लोक आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या खेळाडूंचा समावेश असणार असल्याचे म्हंटले आहे.