ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील काही महिन्यांपासून शेतकरी संघटनांकडून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी सरकारकडून हरएक तऱ्हेचे प्रयत्न सुरू असून, अनेकदा भाजप नेते शेतकरी संघटनांविरोधात आक्रमक झाले आहेत. नुकतेच उत्तरप्रदेशातील एका भाजप खासदाराने शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राकेश टिकैत हे दरोडेखोर असून, परदेशातील पैशांमधून शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू असल्याचा हल्लाबोल बहराईचचे भाजपा खासदार अक्षयवर लाल गोंड यांनी केला.
गोंड म्हणाले, टिकैत हे दरोडेखोर असून, परदेशातील पैशांमधून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शेतकरी सहभागी नसून, राजकीय पक्षाचे लोक सहभागी आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी असते, तर दूध, फळे, भाजीपाला, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला असता. तसेच या दरोडेखोर आंदोलकांना गोंड यांनी खलिस्तानवादी ठरवले.