धामणेः अचानक परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने धामणे, अवचारहट्टी, सुळगा (येळ्ळूर), राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, बस्तवाड, कोंडसकोप्प या भागातील शेतातील कामे ठप्प झाली आहेत.
पावसाने गेले पंधरा दिवस उघडीप दिली होती. त्यामुळे आता सोयाबीन कापून यंत्राच्या सहाय्याने मळणी करणे, बटाटे काढण्याचे आणि दोन्ही पिके काढलेल्या शेतात जोंधळा पेरणी करणे अशी शेतकऱयांची धांदल सुरू असतानाच वळीव पावसाला सुरुवात झाल्याने धामणे, अवचारहट्टी, सुळगा (ये.), राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, बस्तवाड, कोंडुसकोप्प येथील शेतकऱयांची तारांबळ उडून सुरू असलेली शेतातील सर्व कामे थांबल्याने शेतकरीवर्गात चिंता पसरली आहे. आतापर्यंत या भागातील 50 टक्के शेतकऱयांनी सोयाबीन पीक काढले आहे. काही शेतकऱयांनी यंत्राच्या साहाय्याने मळणी केली आहे. ज्या शेतकऱयांनी सोयाबीन कापून गंजी लावून ठेवल्या आहेत, त्यांना अचानक सुरू झालेल्या पावसाने गंजी झाकण्यासाठी शेतकऱयांची धावपळ उडाली. पावसाने शेतकऱयांच्या कामावर अडथळा निर्माण होऊन सर्व कामे ठप्प झाली. या नुकसानीमुळे शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे.









