सोयाबीनसह भातपिकांचे नुकसान : बेळगाव-वेंगुर्ला रोडवर कोसळले झाड, वाहतुकीची कोंडी
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने साऱयांचीच दाणादाण उडविली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सोयाबीन व भातपिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले आहे. बुधवारी बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील गांधी चौकाजवळ मोठे झाड कोसळले. यावेळी सुदैवानेच मोठा अनर्थ टळला.
गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अचानकपणे ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन हा पाऊस कोसळत आहे. यामध्ये जोरदार वाऱयाचीही भर पडत आहे. त्यामुळे वाढलेले भातपीक कोसळत आहे. परिणामी हातातोंडाला आलेले भातपीक वाया गेले आहे. सध्या सोयाबीनच्या काढणीला सुरुवात झाली होती. मात्र, पावसामुळे ती काढणी खोळंबली असून सोयाबीन पूर्णपणे खराब झाले आहे.
बुधवारी दुपारीच पावसाचे जोरदार आगमन झाले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाबरोबरच जोरदार वाराही आला. त्यामुळे बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील गांधी चौकाजवळ एक मोठे झाड कोसळले. यामुळे बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वाहन चालकांनी कॅम्पमधून बेनकनहळ्ळीकडे जाणाऱया रोडवरून वाहने नेली. तर काही जणांनी हनुमाननगरमधून वाहने पुढे नेली.
बाजारपेठेवरही परिणाम
बुधवारी झालेल्या पावसामुळे बेळगाव बाजारपेठेवरही परिणाम झाला. दुपारच्यावेळी पावसाचा शिडकावा झाला तरी सायंकाळच्या सत्रामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. दसरोत्सवाला प्रारंभ होत असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पावसाचा फटका बसला. विजांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे या पावसाचा काही पिकांना फायदा झाला तर काही पिकांना फटका बसल्याचे शेतकऱयांनी सांगितले.