आंध्र-तेलंगणात दाणादाण : दोन्ही राज्यात 25 हून अधिक बळी : जनजीवन विस्कळीत
आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये मंगळवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे बहुतांश भागांमध्ये हाहाकार माजला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक राज्यात पाऊस कोसळत आहे. विशेषतः आंध्रप्रदेश व तेलंगणात तांडव सुरू असून दोन्ही राज्यात 25 हून अधिक जणांचे बळी गेल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. बुधवारी सायंकाळपर्यंत आंध्रात 10 तर तेलंगणात 15 बळींची नोंद झाली होती. हैदराबादमध्ये झालेल्या वेगवेगळय़ा घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र-तेलंगणाप्रमाणेच अन्य राज्यांनाही परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला असून काही प्रमाणात नुकसानही झाले आहे.
वृत्तसंस्था / हैदराबाद
बंगालच्या उपसागरात व काकीनाडा किनारपट्टीलगतच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान विभागाने कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणासह काही राज्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला होता. वातावरणात झालेल्या बदलामुळे गेल्या 24 तासांपासून पाऊस सक्रिय झाला असून आंध्रप्रदेश व तेलंगणात थैमान घातले आहे. आंध्र व तेलंगणातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून राजधानी हैदराबादमध्ये जनजीवन कोलमडून पडले आहे. शहरी भागातही अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे लोक अडकून पडले आहेत. हैदराबादमधील अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मदतकार्य करण्यासाठी शहरातील रस्त्यांवर बोटीतून प्रवास करावा लागत आहे. शहरात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुसळधार पावसामुळे हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गही पुराच्या पाण्याखाली गेला आहे. दम्मईगुडा परिसरात पावसाचे पाणी वाढल्याने अनेक वाहने वाहून गेली आहेत. तसेच बरेच रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जुन्या हैदराबाद शहरात मंगळवारी मध्यरात्री 10 घरांना लागून असलेली संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. या भीषण घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 बालकांचा समावेश आहे. शमशाबादमधील गगनपहाड परिसरातही पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत हैदराबादमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
विद्यापीठांच्या परीक्षा रद्द
परिस्थितीवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नजर ठेवून असून युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले आहे. एसडीआरएफच्या तुकडय़ा प्रभावित झालेल्या भागांमध्ये तैनात आहेत. उस्मानिया विद्यापीठ व जवाहलाल नेहरु टेक्निकल विद्यापीठाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
आंध्रातही जनजीवन विस्कळीत
आंध्रप्रदेशातही मंगळवारी झालेल्या पावसामुळे 40 गावांमधील 350 घरांचे नुकसान झाले आहे. गेल्या 48 तासात राज्यात 10 बळी गेल्याची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच रस्ते आणि शेतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात झाडांचीही पडझड झाली असून अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळले आहेत. पूरस्थितीमुळे काही भागात लोक अडकून पडले असून त्यांना वाचविण्यासाठी मदत व बचाव यंत्रणांची मदत घेतली जात आहे.
नद्या-धरणे तुडंब
यंदाच्या मोसमात समाधानकारक पाऊस झाल्याने यापूर्वीच धरणे व नद्या भरल्या होत्या. त्यातच आता परतीचा पाऊस दमदारपणे कोसळत असल्यामुळे नद्या आणि धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
राज्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाल्याने आणि संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच पूरग्रस्तांना आवश्यक मदतकार्य करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.









