वार्ताहर / किणये
परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात हा पाऊस सध्या जोरदार सुरू आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर घातली आहे. खरीप हंगामातील पिके वाया जाणार की काय याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत होते. बटाटा रताळी व भुईमूग काढण्याच्या कामांना जोर येणार होता. मात्र परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे या कामांमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे.
काही केल्या परतीचा पाऊस थांबेनासा झाला आहे. यामुळे शेतकऱयांची चिंता अधिकच वाढू लागली आहे. शिवारात सध्या भुईमूग काढणीला आले असून पाऊस पडत असल्यामुळे हे पीक कुजून जात आहे. यामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.
सततच्या पावसामुळे बटाटा व रताळी काढणीची कामे खोळंबली आहेत. बहुतांशी शिवारातील पोसवून आलेली भात पिकेही आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या हतबल झाला आहे. शिवारात असलेल्या पिकांची काढणी तसेच भात कापणीसाठी सध्या पावसाने विश्रांती घेण्याची गरज आहे.









