पालकमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन : पीक कर्ज माफ करा! : वेंगुर्ल्यातील बैठकीत आंबा बागायतदारांची मागणी
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
आंबा पीक तयार झालेले असल्याने व सध्या मुंबई मार्केट बंद असल्याने सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, गोवा, कर्नाटक येथे तसेच स्थानिक मार्केट मध्येही आंबा विक्रीस परवानगी मिळावी, अशी मागणी रविवारी उद्योजक, बागायतदारांनी केली. या संदर्भात संबंधित मंत्र्यांशी बोलून येत्या चार दिवसात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
वेंगुर्ले येथील फळसंशोधन केंद्रात रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी फळ प्रक्रिया उद्योजक, आंबा, काजू बागायतदार यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे, मंडल अधिकारी व्ही. जी. जाधव, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत, कीटकशास्त्रज्ञ विजयकुमार देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख सुनील डुबळे, तालुकाप्ढ्रमुख यशवंत परब, महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सेक्रेटरी बिपीन वरसकर, खजिनदार श्रीकृष्ण झांटये, दीपक ठाकुर, सुधीर झांटये, बागायतदार विलास ठाकुर, संतोष गाडगीळ, भुषण नाबर, स्वप्नील चमणकर, नितीन कुबल, दादा आरोलकर, प्रताप गावस्कर, संदेश निकम, आत्माचे अध्यक्ष देवा कांबळी, पणनचे सचिन गावडे, आदी उपस्थित होते.
पीक कर्ज माफ करा!
आंबा वाहतुकीसाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांमार्फत पास देण्यात आले आहेत. मात्र, आंबा काढणीसाठी मोठय़ा प्रमाणात कामगार लागतात. त्यांना चार पाच मैल दूर असणाऱया आंबा बागामध्ये न्यावे लागते. अशावेळी पोलिसांकडून अडवणूक होत असल्याने ज्या आंबा बागायतदारांना पास देण्यात आले आहेत अशा बागायतदारांना किमान चार कामगारांना नेण्या-आणण्यासाठी परवानगी देण्यात यावी. यावर्षी आंबा, काजू पीके मुळातच कमी आल्याने व सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बागायतदार अडचणीत सापडल्याने पीक कर्ज माफ करण्यात यावे, गोवा, कर्नाटक आदी भागात माल नेताना येणाऱया अडचणी दूर कराव्यात. जिल्हय़ात आंबा विक्रीसाठी छोटय़ा-छोटय़ा स्टॉल्सना परवानगी द्यावी, आंबा, काजूप्रमाणेच कोकम, जांभुळ, करवंद प्रक्रिया उद्योजकांना परवानगी देण्यात यावी, मुंबई-वाशी मापेटमध्ये जी हातेबंद पद्धत आहे ती बंद करावी. जिल्हय़ातील काजू बी खरेदी करणाऱया व्यापाऱयांनी यावर्षी काजू प्रक्रिया उद्योग जिवंत राहून शेतकऱयांचे नुकसान होऊ नये, असे बाजरभाव ठेवावेत आदी मागण्या यावेळी भूषण नाबर, नितीन कुबल, विलास कुबल, सदाशिव ओगले, दादा आरोलकर, संदेश निकम, संतोष गाडगीळ, प्रताप गावसकर, महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, श्रीकृष्ण झांटये यांनी मांडल्या. बागायतदारांच्या सर्व मागण्यांबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून जास्तीत-जास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
शासनाच्या नियमांचे पालन करा!
राज्यात अन्य ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मिळत असल्याने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. आपला जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात पोलिसांवरही भयंकर ताण आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांशी हुज्जत घालू नये. सद्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील काजू बोंडू वाया जात आहे. त्यासंदर्भात आपण गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, असे पालकमंत्री म्हणाले.









