शाहूवाडी/प्रतिनिधी
अत्यावश्यक कारण सांगून बाहेरील गावासह पुणे, मुंबई येथून येणार्यांना ही प्रशासन विलगीकरण केले जाणार आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन आणि नियंत्रण विभागाने कोरोनाबाधित क्षेत्रातून नातेवाईक मयत अथवा अन्य अत्यावश्यक सबबीखाली शाहूवाडी तालुक्यात आलेल्यांची कसून चौकशी करून अशा नागरिकांना सक्तीने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार गुरू बिराजदार यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेचा ऑनलाइन परवाना घेऊन गेल्या तीन दिवसात मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली अशा परजिल्ह्यातून शाहुवाडी तालुक्यात दाखल झालेल्या २२ नागरिकांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तालुक्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा अंतर्गत व बाहेरील करोनाबाधित क्षेत्रातून नातेवाईक मयत अथवा अत्यावश्यक कारण सांगून प्रशासकीय ऑनलाइन परवाना घेऊन तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना मोकळीक न देता सीपीआर प्रशासनाच्या देखरेखीखालील संस्थात्मक विलीगिकरण केंद्रात त्यांना सक्तीने पाठविण्यात येणार आहे.








