पंजाबमधील साहिबगंज येथील महादेवगंज ग्रामातील पोलिसांची डोकेदुखी एक पमेरियन कुत्र्यामुळे होत आहे. मुकेश कुमार साह नामक मालकाचा हा कुत्रा आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने तो आणला होता. दोन वर्षांमध्ये त्याच्या पालन पोषणासाठी त्याने 27 हजार रूपये खर्च केले. नंतर एकदा तो कुत्रा चोरीला गेला. मालकाने परिसरात बरीच चौकशी केली. पण कुत्रा काही सापडला नाही. म्हणून त्याने थेट पोलिस स्थानकात तक्रार गुदरली. अशा साध्या चोऱयांचे तपास लावणे खरेतर तसे कठीणच असते. पण येथे मामला जरा वेगळा आहे.
मुकेश कुमार साह हे येथील ‘बडी असामी’ आहेत. शिवाय कुत्र्यावर त्यांचे निरतीशय प्रेम आहे. त्यामुळे कुत्रा शोधण्याच्या उत्तरदायित्वाकडे दुर्लक्ष करणे पोलिसांनाही जड जात आहे. पण बरेच दिवस शोधकार्य करूनही अजून हे श्वान महाशय सापडलेले नाहीत. साह यांनी कुत्रा शोधून देणाऱयास 1,100 रूपयांचे बक्षिसही घोषित केले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांवरही दबाव वाढत आहे. एकंदर, हा कुत्रा पोलिसांची डोकेदुखी बनला आहे.









