नवी दिल्ली
सायबर सुरक्षेशी संबंधित जोखीम पाहता जूनच्या अखेरीस भारत सरकारकडून पबजी मोबाईल गेमवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून भारतातील वापरकर्ते या गेमला ऍपल स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकत नव्हते. परंतु अनेक महिने उलटल्यावर बॅटल रॉयल गेम भारतात पुनरागमनाची तयारी करत आहे. पबजी कॉर्पोरेशनने मागील काही आठवडय़ांमध्ये ग्लोबल क्लाउड सर्व्हिस प्रदात्यांशी बोलणी करत भारतीय वापरकर्त्यांचा डाटा देशातच संग्रहित करण्यास सांगितले आहे. पबजी कॉर्पोरेशन वापरकर्त्यांचा डाटा भारतातच संग्रहित करून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चिंता दूर करू पाहत आहे. भारतातच डाटा संग्रहित करण्याच्या अटीवर सरकारकडून या गेमवरील बंदी हटविली जाण्याची शक्यता आहे.
कंपनीकडून काही हाय-प्रोफाइल स्ट्रीमर्सना खासगीत याविषयी सांगण्यात आले आहे. 2020 च्या अखेरपर्यंत पबजी मोबाईल गेम भारतीय वापरकर्त्यांना ऍप स्टोअरवर मिळू शकतो. भारतात बंदीपूर्वी पबजी मोबाईल गेमचा कोटय़वधी वापरकर्त्यांचा डाटाबेस होता, जो कंपनी परत मिळवू इच्छिते.
दिवाळीनंतर मिळणार संकेत
पबजी मोबाईलगेम भारतात पुनरागमन करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याबद्दल दुमत नाही. कंपनी भारतात दिवाळीनंतर एक विपणन मोहीम राबविण्याची योजना आखत आहे. याचबरोबर पबजी भारताच्या कंपन्या पेटीएम, एअरटेल आणि रिलायन्स जियोशीही भारतात गेमच्या वितरणासंबंधी चर्चा करत आहे.









