प्रतिनिधी / नावली
पन्हाळा बांधारी परिसरात अतिवृष्टीसदृष्य पाऊस पडत असून मसाईपठाराच्या पायथ्याशी असलेल्या चहाची मळी परिसरात मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले. यामुळे म्हाळुंगे गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे मसाई पठारावर जाणारा रस्ता बंद झाला आहे.बुधवार पेठ-बादेवाडी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
जेऊर वेखंडवाडी रस्त्यावरही जमीन खचून रस्त्यावर आल्याने पुढील गावांना जाणारा रस्ता बंद झाला आहे. संततधार पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून परिसरातील ओढे,नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. जेऊर, तुरूकवाडी, महाळुंगे, वेखंडवाडी बादेवाडी, बोरिवडे, आवळी, नावली,पैजारवाडी या परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून पाणी शेतात घुसल्याने सर्व पिके वाहून गेली आहेत.
बुधवारपेठ ते बादेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारपेठ येथे पन्हाळा मुख्य रस्त्यावरील भुस्कलन व गडावरून पाण्याबरोबर येणारया दगड माती व गाळामुळे वाहतूक बंद झाली आहे व रत्यावर गाळाचा खच साचल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे . तसेच याच रस्त्यावरील वेखंडवाडीजवळ मोठ्या प्रमाणात भूस्कलन होऊन जवळपास १०० मीटर रस्त्यावर डोंगरच तयार झाल्याने वेखंडवाडी , बादेवाडी या गावांचा येण्याजाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तसेच आजही प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु असलेने बांधारी परिसरात भितीचे वातावरण आहे.
दरम्यान मसाई पठार -म्हाळुंगे ला जाणाऱ्या रस्त्यावर लगतचा डोंगर भूस्खलन होऊन वाहून आलेल्या गाळामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता पण प्रशासनाची वाट न पाहता म्हाळुंगे ग्रामस्थानी पुन्हा एकजूट दाखवत श्रमदानातून प्रचंड प्रमाणात वाहून आलेला गाळ रस्त्यावरून बाजूला करून रस्ता वाहतूकीसाठी खुला केला.












