स्वच्छ सर्वेक्षणाचा नगरपरिषदेस विसर
पन्हाळा-प्रतिनिधी
सध्या कोरोनाची लाट ओसरली असली तरी धोका कायमचा टळलेला नाही. त्यामुळे शासनाकडुन मास्क वापरा, सँनिटायझर वापरा, स्वच्छता राखा अशा संदेश देण्यात येत आहे. पण पन्हाळ्यातील रेडेमहाल परिसराचे चित्र पहीले की याचा पन्हाळा नगरपरिषदेला विसर पडला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कारण याठिकाणी गटर्स व रस्त्याची साफसफाई न झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी लक्ष वेधुन या परिसराची स्वच्छता करण्यात यावी अशी लेखी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
पन्हाळ्यातील ऐतिहासिक रेडेमहाल नेहमीच उपेक्षित राहिला आहे. त्यातच आता याठिकाणी होणाऱ्या अस्वच्छतेमुळे नवीन समस्या उजेडात आली आहे.रेडेमहाल परिसरातील गटर्स व रस्त्याचे सफाई न झाल्याने घाणी बरोबर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील व ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान पन्हाळा नगरपरिषदेकडुन शहरातील स्वच्छता करण्याचा ठेका व्ही.डी.सी कंपनीला देण्यात आला आहे. मागील दोन महिन्याचे बील देखील नगरपरिषदेने कंपनीला अदा केले आहे. पण संबंधित कंपनीकडुन मागील एक महिन्यापासुन रेडेमहाल परिसरातील गटर्स व रस्त्यची साफसफाई केली नसल्याचे नागरिकांच्याकडुन सांगण्यात आले असल्याचे असिफ मोकाशी यांनी निवेदनात म्हंटले आहे.
तरी नगरपरिषदेकडुन रेडेमहाल परिसरास सह शहरातील उर्वरित भागाची साफसफाई करण्यासाठी संबंधित कंपनीला समज द्यावी, अशी मागणी मोकाशी यांनी केली आहे. त्यामुळे कंपनी सोबत नगरपरिषद काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागुन राहिले आहे. दरम्यान पन्हाळा नगरपरिषदेने सातत्याने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात स्थान मिळविले आहे. पण रेडेमहाल परिसराचे चित्र पाहाता याचा विसर पडला आहे की काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे चुक कंपनीची पण शिक्षा नगरपरिषदेला अशी अवस्था झाली निर्माण झाली आहे.









