पन्हाळा-बुधवारपेठ दरम्यान उड्डाणपुलासाठी प्रयत्न : रेडेघाट मार्गे बुधवारपेठ पर्यंत पर्यायी रस्ता करण्याच्या सुचना
प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ व तालुक्याचे ठिकाण आहे.पन्हाळगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे.पन्हाळा-बुधवारपेठ दरम्यान उड्डाणपुलामुळे पर्यायी रस्त्याचा मार्ग कायमचा निकाली निघेल. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम लवकर सुरु होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच पन्हाळ्याचा मुख्य मार्ग बंद झाल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय़ लक्षात घेता. लता मंगेशकर बंगला, रेडेघाड मार्गे बुधवारपेठ पर्यंत पर्यायी रस्ता तातडीने सुरु करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे खा. धैर्यशील माने यांनी सांगितले.
पन्हाळा येथील चार दरवाजा येथील मुख्य रस्ता खचल्याने पन्हाळ्याचा मुख्य मार्ग बंद झाला आहे. या रस्त्याची पाहणी खा.धैर्यशील माने यांनी केली.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर,शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी,तहसिलदार रमेश शेंडगे,गटविकास अधिकारी तुलशीदास शिंदे,माजी नगरसेवक अख्तर मुल्ला, रविंद्र धडेल, मुख्याधिकारी स्वरुप खारगे, शिवसेना शहरप्रमुख मारुती माने, उपशहरप्रमुख जुनैद मुजावर आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.
पन्हाळा गडाला ऐतिहासिक महत्त्व तसेच प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने पर्यायी मार्गाची गरज ही नित्याचीच बनली आहे.पन्हाळ्याचा सध्याचा मुख्य रस्ता खचुन, मार्ग बंद होण्याची ही दुसरी वेळ आहे. तीन दरवाजा येथुन पर्याय असला तरी त्याठिकाणी पुरात्त्व विभागाच्या नियमामुळे अडचणी आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटनाचा अंदाज घेत या मुख्य रस्त्याची डागडुजी करणे हा मार्ग नसुन उड्डाणपुल हाच याला पर्याय आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची सर्वप्रक्रिया पुर्ण करुन प्रत्यक्षात उड्डाणपुलाचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे देखील खा.माने यांनी सांगितले.
सन 2019 साली पन्हाळा-बुधवारपेठ हा रस्ता खचल्याने बुधवारपेठ ते पन्हाळा किल्ल्याला जाणारा नऊशे मीटर लांबीचा उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्कालीन आमदार सत्यजीत पाटील यांच्या कारकिर्दीत मंजुर केला होता. दरम्यान, उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. या उड्डाणपुलाचे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन त्याचा अहवाल पुणे येथील विभागीय कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांकडुन जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन कामाला सुरुवात होईल. तरी कामाला तातडीने सुरुवात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अग्रही मागणी करणार असल्याची माहिती माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी यावेळी दिली.यानंतर पन्हाळा परिसरात पावासामुळे नुकसान झाल्या भागाची पाहणी देखील खा.धैर्यशील माने व माजी आ.पाटील यांनी यावेळी केली.