पन्हाळ्यातील विकासकामे बेकादेशीर झाल्याचा आरोप
पन्हाळा / प्रतिनिधी
काम आधी आणि संबंधित कामाची टेंडर प्रक्रिया नंतर अशा अजब कारभार पन्हाळा नगरपरिषदेकडुन सुरु आहे. प्रभाग क्रमांक पाच मधील काझी बोळ येथील सांडपाणी निर्गतकरिता बसविण्यात आलेल्या पाईप कामात हा प्रकार झाला आहे. त्याच बरोबर पन्हाळ्यातील नगरपरिषदेकडुन करण्यात आलेली विविध कामे निकृष्ट दर्जाची असुन सरदची कामे कागदावर एक व प्रत्यक्षात दुसरे दिसुन येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते व माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी केला आहे. या सर्व कामांची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदना द्वारे मोकाशी यांनी केली आहे. तसेच पन्हाळ्यातील नागरिकांनी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे सदरच्या सर्व कामाबाबात तक्रार सादर केली आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली असुन चौकशीतुन काय निष्पन्न होणार याकडे पन्हाळा वासियांचे लक्ष लागले आहे.
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेवर एकहाती जनसुराज्यशक्ती पक्षाची सत्ता आहे. याठिकाणी जनतेतुन निवड झालेल्या नगराध्यक्षासह चौदा नगरसवेक सत्ताधारी पक्षाचे आहेत. तर विरोधी स्थानिक आघाडीचे पाच सदस्य असुन येथे विरोधी पक्षनेते म्हणुन असिफ मोकाशी भुमिका बजावत आहेत. सध्या एक हाती सत्ता असल्याने व जनतेतुन नगराध्यक्षांची निवड झाल्याने त्यांना विशेष अधिकार प्राप्त आहेत.
याचाच गैरफायदा घेत नगरपरिषदेत मनमानी कारभार सुरु असुन नगराध्यक्ष सत्ताधारी नगरसेवकांनादेखील विश्वास न घेता कामकाज करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.काही कामांना तर सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केल्याने ही कामे रद्द करण्याची नामुष्की ओढावली.
त्यात आता प्रभाग पाच मध्ये स्थानिक नगरसेवक विरोधी असल्याने त्यांना विचार न घेता व सभेमध्ये विषय मंजुर नहोताच काझी बोळ येथे सांडपाणी निर्गतकरिता पाईप टाकण्याचे काम सुरु आहे.त्यात सदरचे काम अगोदर सुरु करुन तक्रारी नंतर याचे टेंडर प्रक्रिया पार पडली.तसेच याठिकाणी टाकण्यात आलेल्या पाईपस् या निकृष्ट दर्जाच्या असुन ही गोष्ट असिफ मोकाशी यांनी निदर्शनास आणुन देखील आहे त्याच पाईप बसविण्यात येत आहेत.ही बाब गंभीर असुन नारिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा सदरचा प्रकार आहे.तरी या कामाची चौकशीची मागणी असिफ मोकाशी यांनी केली आहे.
पन्हाळ्यातील भाडेकर गल्ली,गोलंदाज बोळ,केडीसीसी बँक ते आठवडी बाजार क्राँक्रिटीकरण रस्ता,कोरे घर ते मोरे घर गटर्स,काशीद गल्ली ते कोरे घर गटर्स,गांडुळ खत प्रकल्प येथील काँक्रिटीकरण रस्ता,स्वच्छ सर्वेक्षणतंर्गत करण्यात आलेली विविध कामे नियमबाह्य व निकृष्ट पद्धतीने झाले आहेत.ही गंभीर बाब पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निदर्शनास आणुन देखील यावर कोणतिच कारवाई नकरता संबंधित कामांची बीले तात्काळ देण्यात आली आहेत.
तरी यासंपुर्ण कामाची चौकशीची मागणी नगरविकास मंत्र्याकडे विरोधी पक्ष नेते असिफ मोकाशी यांनी केली आहे.तसेच पन्हाळा वासियांच्या वतीने देखील सदरच्या कामावर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.यामुळे खरेच सर्वकामांत काही भोंगळ कारभार झाला आहे का..हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.त्यामुळे याकामांची चौकशी अंती कोणाचे पितळ उघडणार याकडे नजरा लागल्या आहेत.