पुणे / प्रतिनिधी :
माजी केंदीय सचिव, बेळगावचे माजी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त तसेच गोवा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू पद्मभूषण डॉ. पद्माकर दुभाषी यांचे सोमवारी सकाळी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. दुभाषी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. दुभाषी यांचा जन्म 7 मार्च 1930 मध्ये कारवार येथे झाला. ते 1953 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. डॉ. दुभाषी यांनी राज्य तसेच केंदात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. 1981 मध्ये निवृत्त झालेल्या डॉ. दुभाषी यांनी त्यानंतरही प्रशासकीय स्तरावर मोलाचे योगदान दिले.
बेळगाव जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त म्हणूनही डॉ. दुभाषी यांनी ठसा उमटविला. मराठी-कानडी वाद व त्यावेळची परिस्थिती त्यांनी अत्यंत कौशल्याने हाताळली. सीमालढय़ाचे अग्रणी बाबूराव ठाकूर यांच्याशीही त्यांचे अत्यंत जिव्हाळय़ाचे संबंध होते. 1990 ते 1995 या काळात त्यांनी गोवा विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. सार्वजनिक प्रशासन, राज्य शास्त्र, पंचायतराज, अर्थव्यवस्था आदी विषयांवर त्यांनी 27 पुस्तके लिहिली असून, त्यातील सहा पुस्तके ही मराठीतील आहेत. प्रशासकीय सेवेतील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यातील भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचेही ते अध्यक्ष होते.









