राज्य सरकारची तयारी : उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची घोषणा
प्रतिनिधी / बेंगळूर
उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेला वाव देण्याच्या उद्देशाने खासगी आणि सरकारी सहभागातील अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि पदवी शिक्षण संस्थांना संपूर्ण स्वायत्तता देण्यास राज्य सरकार तयार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी केली.
दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी विधानसौध येथे आयोजित ‘उत्तम प्रशासन दिन’ कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. समाजातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि वैयक्तिकपणे कोणत्याही समस्यांवर मात करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल करण्यात येत आहेत. जागतिक पातळीवर उच्च शिक्षण देणाऱया संस्थांना अधिक स्वायत्तता आणि रचनात्मक स्वायत्तता देऊन उत्तम निकाल मिळविण्यात येत आहे. आपले सरकारही या पावलावर पाऊल ठेवण्यास तयार आहे. सर्वकाही सरकारच आपल्या ताब्यात ठेवून गुणात्मक विकास साध्य करणे शक्य नाही, असे ते म्हणाले.
नव्याने जारी करण्यात येणाऱया राष्ट्रीय शिक्षण धोरणात देखील स्वायत्ततेचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. उच्च शिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी, उत्तम अध्ययन-अध्यापनासाठी आणि संशोधनाला नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे अनुकूल होणार आहे, असेही डॉ. अश्वथ नारायण यांनी सांगितले.
कौशल्य विकासाला अधिक प्राधान्य
उच्च शिक्षण आणि कौशल्य विकासाने विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्यात येईल. भारतासह कर्नाटकातही उद्योग क्षेत्र विस्तारले आहे. मात्र, त्याला अनुसरून उत्तम, कौशल्यप्राप्त मनुष्यबळ पुरविण्यात आपण अपयशी ठरलो आहे. त्यावर सरकारने तोडगा काढला आहे. राज्यातील युवा वर्गाला कोणत्या प्रकारच्या कौशल्यांची आणि रोजगाराची आवश्यकता आहे, याचे अध्ययन करण्यात येत आहे. त्या दिशेने प्रयत्नही सुरू आहेत, असेही ते म्हणाले.









