बेळगाव : पदवीपूर्व शिक्षण खाते व नेमव्वा कुडची पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत सेंट पॉल्स महाविद्यालयाने जीएसएस महाविद्यालयाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
मराठी विद्यानिकेतन मैदानावर या स्पर्धेत जिल्हय़ातील 21 महाविद्यालयीन संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन नेमव्वा कुडची महाविद्यालय संचालक मंडळाच्या हस्ते मैदानाची पूजा व फुटबॉलला किक मारून करण्यात आले. पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल्स महाविद्यालयाने इस्लामियाचा टायब्रेकरवर 4-3 असा पराभव केला तर दुसऱया उपांत्य सामन्यात जीएसएस महाविद्यालयाने गोगटे महाविद्यालयाचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीनंतर शेवटी पंचानी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. त्यामध्ये सेंट पॉल्सने जीएसएसचा 4-3 असा पराभव केला. सेंट पॉल्सतर्फे ऍस्टीन सिल्वा, रजत सावंत, रेहान मुजावर, अभिवकास यांनी तर जीएसएसतर्फे बसव प्रकाश, किशन व प्रज्वल यांनी गोल केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे नेमव्वा कुडची महाविद्यालयाचे प्राचार्य आय. बी. कुंभार, प्रा. आर. व्ही. पाटील, प्रा. पी. एस. पाटील, प्रा. आय. टी. होण्णामने, एस. जी. शिंगाडे, शिव नायकर, जी. एन. पाटील यांच्या हस्ते विजेत्या सेंट पॉल्स, उपविजेत्या जीएसएस संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश मजुकर, हर्ष रेडेकर, योगेश सांगावकर, विशाल कामू, शिवराज पाटील, शुभम यादव यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित जडे, जयश्री निंबाळकर, अनंतराव पाटील व नेमव्वा कुडचीच्या प्राध्यापक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.









