प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड 19 मुळे सर्वाधिक प्रभावित झालेले क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे. शाळांबरोबरच महाविद्यालयांच्या शैक्षणिक वाटचालीवर परिणाम झाला असून परिणामी पदवीपूर्व महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात येणार असल्याचे पदवीपूर्व शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. नोव्हेंबरमध्ये महाविद्यालये सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र मागील सहा-सात महिने सुटीतच गेले असल्याने अभ्यासक्रमपूर्तीचे संकट महाविद्यालयांच्या वाटचालीवर आहे. यामुळे पदवीपूर्व शिक्षण विभागाने पदवीपूर्व प्रथम व द्वितीय वर्षांच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली आहे.
2020-21 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ कोरोना संकटात अडकला होता. यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत यू-टय़ुब तसेच विषयनिहाय लिंकच्या माध्यमातून प्रथम व द्वितीय वर्षाची शैक्षणिक वाटचाल सुरू आहे. मात्र कला, वाणिज्य व विज्ञान शाखानिहाय ऑनलाईन अध्यापन करताना विविध अडचणी निर्माण होत असून वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे पदवीपूर्व शिक्षण मंडळाने विषयनिहाय घटकातील काही भाग वगळला असून यानुसार अभ्यासक्रमात 30 टक्के कपात होणार आहे.
मे 2020 ते मार्च 2020 या दरम्यान पदवीपूर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नियोजित करण्यात आले होते. मात्र कोविड 19 आणि लॉकडाऊनमुळे द्वितीय शैक्षणिक वर्ष विलंबाने ऑनलाईनद्वारे सुरू करण्यात आले. प्रथम शैक्षणिक वर्ष दहावी निकालानंतर नुकतेच दीड-दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. नियोजित अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परीक्षा केव्हा होणार याबाबत अनिश्चितता आहे. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून पुढील सहा महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करतानाच्या समस्यांचा विचार करून अभ्यासक्रम कपातीचा आदेश देत याबाबतची सविस्तर माहिती पदवीपूर्व विभागाने खात्याच्या वेबसाईटवर दिली आहे.









