प्रतिनिधी /बेळगाव :
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोटय़वधी निधी खर्ची घालून स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र, कॅन्टोन्मेंट आणि स्मार्ट सिटी कंपनीकडे बोट करून स्मार्ट बसथांब्यांची देखभाल करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. पण स्मार्ट बसथांबे महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले असून शहरातील सर्व बसथांब्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशीधर कुरेर यांनी दिली.
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी एलईडी जाहिरात फलक, ई-टॉयलेट, कॅफेटोरिया आदी सुविधा उपलब्ध करण्याची तरतूद स्मार्ट बसथांब्यात करण्यात आली आहे. सदर बसथांब्यांची देखभाल महापालिकेकडून करण्यात येत होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यांवरील तसेच महापालिका आणि कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व बसथांब्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आली आहे. बसथांब्यांची विकासकामे पूर्ण करून सर्व बसथांबे महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले आहेत. सदर बसथांब्यांवर जाहिरात फलक लावण्यासह कॅफेटोरिया व ई-टॉयलेटची देखभाल करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या कंत्राटदारावर बसथांब्यांच्या देखभालीची जबाबदारी असणार आहे. पण जोपर्यंत कंत्राटदार निश्चित होत नाही, तोपर्यंत बसथांब्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशीधर कुरेर यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येत असल्याने पथदिपांची देखभाल करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीची असल्याचे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत शशीधर कुरेर यांच्याकडे पथदिपांबाबत विचारणा केली असता, शहरातील प्रत्येक पथदिपाची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. ज्या रस्त्यावर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास राबविताना पथदीप नादुरुस्त झाल्यास केवळ त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीची आहे. त्यामुळे दुरुस्तीची कामे करण्याची सूचना कंत्राटदारांना करण्यात आल्याचे कुरेर यांनी सांगितले.
महापालिकेकडून कोणतीच कार्यवाही नाही
बॅ. नाथ पै चौक ते येळ्ळूर कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे तसेच महात्मा फुले रोड, कॉलेज रोड अशा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून नादुरुस्त पथदिपांची दुरुस्ती केली आहे. तरीही पथदीप बंद अवस्थेत आहेत. याबाबत महापालिकेकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. काही रस्त्यांवरील पथदीप बंद असूनही महापालिकेकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. केवळ स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रकार मनपा अधिकाऱयांनी चालविला असल्याचे निदर्शनास आले आहे.









