पांगुळ गल्लीतील प्रकार : निधीचा दुरुपयोग केल्याने अधिकाऱयांच्या गैरकारभाराबद्दल नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
पांगुळ गल्ली रस्त्याचे रुंदीकरण करताना विविध वाहिन्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळी पथदीपांसाठी विद्युत वाहिन्या घालून सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र घालण्यात आलेल्या विद्युत वाहिन्या चुकीच्या असल्याचे सांगून आता पथदीपांसाठी नव्याने विद्युत वाहिन्या घालण्यासाठी खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पांगुळ गल्ली रस्त्याचे रुंदीकरण 45 फूट करण्यात येणार होते. मात्र इमारतींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्मयता होती. तसेच काही इमारतींना 40 फूट रस्ता वगळून इमारत बांधकाम परवाना देण्यात आला होता. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली होती. रस्त्याचे रुंदी कमी केली तरी विविध वाहिन्या घालण्याचे काम रुंदीकरणावेळी करण्यात आले होते. प्रत्येक घरोघरी नळ जोडणीसाठी जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या तसेच डेनेज जोडणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रस्त्याशेजारी पथदीपांकरिता विद्युत वाहिन्या घालून ठेवण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी पथदीप बसविण्यात येणार होते. मात्र निधी अपुरा असल्याने पथदीप बसविण्याचे काम रखडले होते. मात्र आता स्मार्ट सिटी योजनेंतर्गत संपूर्ण शहरात एलईडी पथदीप बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध गल्ल्यांमध्ये पथदीप बसविण्यासाठी विद्युत वाहिन्या घालण्यात येत आहेत. तसेच पांगुळ गल्लीतदेखील पथदीप बसविण्यासाठी विद्युत वाहिन्या घालण्याचे काम हाती घेतले आहे.
विद्युत वाहिन्या घालण्यासाठी व पथदीप बसविण्यासाठी खोदाईचे काम मंगळवारी सकाळी सुरू करण्यात आले. त्यामुळे येथील रहिवाशांनी खोदाई कशासाठी? अशी विचारणा केली असता, पथदीप बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यापूर्वीच विद्युत वाहिन्या घालून पथदीप बसविण्याकरिता ठिकठिकाणी विद्युत वाहिन्या सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र सदर अंतर चुकीचे असून नव्याने विद्युत वाहिन्या घालण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी व कंत्राटदाराने सांगितले. यापूर्वीच्या विद्युत वाहिन्यांचा उपयोग करावा, अशी सूचना नागरिकांनी केली. मात्र याकडे कानाडोळा करून पांगुळ गल्लीतील रस्त्याशेजारी खोदाईचे काम सुरूच ठेवण्यात आले.
त्यामुळे पथदीपांकरिता यापूर्वी विद्युत वाहिन्या घालण्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी पाण्यात गेला आहे. निधीचा दुरुपयोग करण्यात आला असून अधिकाऱयांच्या गैरकारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विकासकामे राबविण्यासाठी जनतेच्या निधीचा उपयोग केला जातो. त्यामुळे वाया गेलेला निधी जनतेचा असल्याची टीका नागरिक करीत आहेत. नियोजन करून विकासकामे करावीत, अशी मागणी होत आहे.









