देसूरनजीक पावसामुळे घडली दुर्घटना
प्रतिनिधी /बेळगाव
परतीच्या धुवाधार पावसामुळे भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी दुपारी पत्र्याचे शेड कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. देसूरजवळ ही घटना घडली असून दोन्ही कामगार विजापूर जिल्हय़ातील आहेत.
रेल्वे ट्रकचे काम करण्यासाठी विजापूर जिल्हय़ातून आलेल्या कामगारांचा मृत्यू झाला आहे. वेंकटेश भीमाप्पा वड्डर (वय 35) रा. बबलेश्वर, जिल्हा विजापूर, बसवराज वड्डर (वय 38) रा. कवलगी, जिल्हा विजापूर अशी त्यांची नावे असून दोन्ही मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून ते बेळगावला दाखल झाल्यानंतर उत्तरीय तपासणीची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
वेंकटेश व बसवराज रेल्वे ट्रकचे काम करीत होते. रविवारी दुपारी धुवाधार पाऊस आला. आडोशासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये या दोन्ही कामगारांनी आसरा घेतला होता. त्याचवेळी शेड कोसळून त्यांच्या अंगावर पडले. शेडला वीजपुरवठा करणारी तारही तुटली असून या कामगारांचा मृत्यू शॉक लागून झाला की आणखी कशामुळे? याचा तपास करण्यात येत आहे.
शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकणार आहे. शेड अंगावर पडल्यामुळे मृत्यू झाला की विद्युतभारित तार तुटून विजेचा धक्का बसल्याने ही घटना घडली, यासंबंधी माहिती मिळविण्यात येत आहे. शेडमध्ये केवळ दोघेच होते, असे पोलिसांनी सांगितले.









