प्रतिनिधी / बेळगाव
पत्रकार आणि म. ए. समितीचे कार्यकर्ते व श्री नामदेव दैवकी संस्थेचे संचालक व्दारकानाथ सचिदानंद उरणकर (वय 68, मुळचे खडेबाजार, बेळगाव येथील व सध्या रा. संतमीरा रोड, अनगोळ) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
व्दारकानाथ उरणकर यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. सीमाप्रश्नाच्या विविध आंदोलनांमध्येही त्यांनी आपला सहभाग दर्शविला होता. श्री नामदेव दैवकी संस्थेच्या प्रत्येक कार्यामध्ये ते हिरीरिने भाग घेत होते. पत्रकार क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यामध्येही त्यांनी आपला ठसा उमटविला होता. त्यांच्या निधनामुळे म. ए. समितीबरोबरच पत्रकार क्षेत्राचीही हानी झाली आहे.









