सांगली/प्रतिनिधी
किरकोळ कारण देऊन राज्यातील पत्रकारांच्या अधिस्वीकृती पत्रिका रद्द करण्याचे महा विकास आघाडी सरकारचे धोरण चुकीचे असून या विरोधात भारतीय जनता पक्ष येत्या अधिवेशनात विधिमंडळात आवाज उठवेल असे आश्वासन सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रकारांना दिले.
मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगलीत पत्रकारांना शुभेच्छा देताना आमदार गाडगीळ यांनी ही घोषणा केली.
गाडगीळ म्हणाले, अधिस्वीकृती पत्रिका आणि त्याचे लाभ म्हणजे फार मोठी बाब नाही. या पत्रिका मुळे राज्यातील युवा पत्रकारांना मुक्तपणे प्रवास करणे आणि समाजातील चांगल्या बातम्या बरोबरच अन्याय होणार्या ठिकाणांवर पोचून अशा प्रश्नी वाचा फोडणे सोयीचे झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपने या बाबतीत उदार धोरण ठेवून जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रांचा लाभ व्हावा अशा पद्धतीचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे सांगली जिल्ह्यासह राज्यातील अनेक युवा पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रे मिळण्याची सोय झाली होती.
मात्र महा विकास आघाडी सरकार सत्तेवर येताच त्यांनी आपल्या मनाच्या कोतेपणाचे दर्शन घडवत शासकीय माहिती व जनसंपर्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत किरकोळ कारण देऊन या अधिस्वीकृती पत्रिका रद्द करण्याचे धोरण अवलंबले आहे. राज्यभर अशा तक्रारी भाजप कडे येत आहेत. सांगली जिल्ह्यात तर युवा पत्रकारांच्या बरोबर ज्येष्ठ पत्रकारांवर ही अन्याय झाल्याच्या तक्रारी आहेत. काही पत्रकारांनी आपणास ही माहिती दिल्यानंतर याची गांभीर्याने दखल घेतली आहे. राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार पत्रकारांच्या या प्रश्नाकडे सहानुभूतीपूर्वक विचार करत असून याबाबत आपण विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि प्रवीण दरेकर यांना ई-मेल पाठवून माहिती पाठवली आहे. या अधिवेशनात किरकोळ कारणाने पत्रकारांच्या रद्द केलेल्या अधिस्वीकृती प्रश्नी भाजप नक्की आवाज उठवेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी, कार्याध्यक्ष बलराज पवार, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे, उपाध्यक्ष कुलदीप देवकुळे, विनायक जाधव, घनश्याम नवाथे, चिटणीस चिंतामणी कुलकर्णी, शैलेश पेटकर, असिफ मुरसल, अक्रम शेख, सुधाकर पाटील, किरण जाधव किशोर जाधव चंद्रकांत गायकवाड सचिन ठाणेकर सुकुमार पाटील प्रशांत साळुंके हुपरीकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.








