प्रतिनिधी / बेळगाव :
पत्रकारितेचे आयाम आज पूर्णतः बदलले आहे. पांढऱयावर काळे होण्याच्या पारंपरिक प्रक्रियेत आता अनेक रंगही मिसळू लागले आहेत. त्याचा अर्थ शोधून विवेकाने वृत्तांकन करणे हे पत्रकारांच्या समोर आव्हान आहे, असे मत तरुण भारतच्या पत्रकार मनीषा सुभेदार यांनी व्यक्त केले.
इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्स ऑफ बेळगाव शाखेच्यावतीने बुधवारी स्वरुप प्लाझा येथील संस्थेच्या शिवणगी मराठे सभागृहात समत्वम संकल्पनेवर महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर चिकोडी येथील पंख संस्थेच्या संचालिका गौरी मांजरेकर, संस्थेंचे चेअरमन सतीश मेहता, इव्हेंट डायरेक्टर राहुल अडके, सचिव एम. एस. तिगडी आदी उपस्थित होते.
मनीषा सुभेदार यांनी 26 वर्षांच्या आपल्या पत्रकारीतेच्या कारकिर्दीतील महत्वाच्या घटना आणि काही प्रश्नांमध्ये दिलेला लढा सांगितला. आज पत्रकारीतेचे आयाम बदलले आहेत. इंटरनेटचे माध्यम उपयोगी ठरले तरी त्यामुळे पत्रकारांच्या अभ्यासाला आणि शोध पत्रकारितेला मर्यादा आल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.
गौरी मांजरेकर यांनी पंख संस्थेची स्थापना करण्याची गरज व्यक्त करुन गर्दीचे अनुकरण न करता वेगळे काही करण्याची इच्छा असल्याने पंखची स्थापना केली. त्या अंतर्गत हस्तकलेला प्राधान्य देण्यात येते. या शिवाय ब्लॅंकेटस् ऑफ लव्ह, हॅपी विंटर जॅकेट, पर्यावरण पुरक उत्पादने असे आपले विविध उपक्रम आहेत. आजही अनेक वंचित घटकातील मुलींना सॅनिटरी पॅडस् घेणे परवडत नाही. म्हणून सेफ पिरीअड असा उपक्रमही राबवत असल्याचे सांगितले. आपल्या संस्थेचे कार्य त्यांनी चित्रफीतीच्या माध्यमातून व्यक्त केले.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सतीश मेहता यांनी स्वागत केले. महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. त्यांचे कौतुक करणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. सुत्रसंचालन श्रेया दंडीन व वैष्णवी दवणी यांनी केले. सचिव एम. एस. तिगडी यांनी आभार मानले. श्रुती बेळगुंदी व हिमांगी प्रभू यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी महिला चार्टर्ड अकाऊंटन्ससाठी विविध स्वरुपाचे खेळ श्रेया, वैष्णवी व श्रुती यांनी घेतले.