उचगाव / वार्ताहर
पत्रकार ,पोलिस व जनता यासर्वांच्या सहकार्यामुळे पोलिस सेवेत चांगले,प्रामाणिक कर्तव्य बजावता आले याचे समाधान आहे असे प्रतिपादन करवीरचे पोलिस उपाधिक्षक आर.आर.पाटील यांनी केले. करवीर पूर्व पत्रकार संघाच्यावतीने डिवायएसपी आर.आर.पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त बुधवारी सायंकाळी गांधीनगर ता.करवीर येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
आर.आर.पाटील यांनी आपल्या ३५ वर्षाच्या कारकिर्दिचा लेखाजोखा मनोगतात मांडला. सर्वसामान्य जनतेसाठी चोवीस तास प्रामाणिकपणे कायदेशीर चौकटीत राहून सेवा बजावली. अनेक कठीण प्रसंग आले मात्र न डगमगता सेवेसाठी व्रतस्थ राहून समाधानकारक सेवा बजावली. पत्रकारांच्या चांगल्या व मैत्रीपूर्ण सहकार्य त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.स्व.माजी गृहमंत्री आर.आर.पाटील आबा यांच्या मार्गदर्शक तत्वावर आमची प्रामाणिक वाटचाल झाली असेही पाटील म्हणाले.
गांधीनगर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यराज घुले यांनी वडीलकी नात्याने सर्वजण आर.आर. पाटील यांना तात्या म्हणतात. त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीवर असुन अत्यंत साधेपणाने, मैत्रीपूर्ण वडिलकीच्या नात्याने त्यांनी पोलिसिंग केले आहे. जोतिबा यात्रा नियोजन असो किंवा एखादा मोठा बाका प्रसंग असो तात्यांनी तो लिलया पेलला आहे.
करवीर पूर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष तरुण भारत पत्रकार संतोष माने यांनी पत्रकार व पोलिस यांच्यातील दुवा म्हणून आर.आर.पाटील यांनी काम पाहिले असुन कामाप्रती झोकून देण्याची त्यांची कामाची पद्धत सर्वांसमोर आदर्शवत आहे. यावेळी करवीर पूर्व पत्रकार संघ व गांधीनगर पोलिस तसेच गांधीनगर व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने डिवायएसपी आर.आर.पाटील यांचा शाल, फेटा व जोतिबाची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला. पत्रकार प्रा.प्रविण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा.सुरेश मसुटे,स्वागत व प्रास्तविक संतोष माने यांनी तर आभार बाबासाहेब नेर्ले यांनी मानले.यावेळी गांधीनगरचे पोलिस उपनिरीक्षक अतुल कदम, संघाचे अध्यक्ष संतोष माने, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, अनिल निगडे,व्यापारी व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.









