चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकले,
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
चारित्र्याच्या संशयावरून राजेंद्र महादेव जाधव (वय 55 रा. व्हॅलीव्हयुवरोड प्राथमिक शाळा क्र 2 च्या मागे महाबळेश्वर) या नराधमाने बुधवारी सकाळी आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकुन तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पत्नीला पेटवुन नराधम पळुन गेला असुन महाबळेश्वर पोलीस या नराधमाचा शोध घेत आहे. दरम्यान, घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जान्हवे कराडे यांनी भेट दिली. दरम्यान, महाबळेश्वर पोलीस नराधम पतीचा शोध घेत आहेत.
माणुसकीला काळीमा फासणाऱया एका भयंकर घटनेने महाबळेश्वर हादरले. प्राथमिक शाळा क्र 2 च्या इमारतीच्या मागे एका चाळीत वेण्णालेक येथे घोडे व्यवसाय करणारा राजेंद्र महादेव जाधव हा आपली पत्नी बायना तसेच प्रकाश, श्रीकांत व सचिन ही तीन मुले व एक मुलगी विद्या असे एकत्र राहतात. राजेंद्र हा दारूडय़ा असुन तो रोज आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असतो. यावरून पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असतात. बुधवारी सकाळी पती घरी नसताना पावणे आठच्या दरम्यान पत्नी नैसर्गिक विधीसाठी गेली होती. त्यावेळी पती हा घरी आला त्याने पाहिले पत्नी घरात नाही व सर्व मुलेही झोपली आहेत. त्यावेळी या नराधमाने आपल्या चाळीतील घराला बाहेरून कुलूप लावले. घराशेजारी असलेल्या एका गल्लीत तो आपल्या पत्नीची वाट पहात होता. त्यावेळी त्याच्या हातात प्लास्टिकचा एक मग होता. पत्नी शौचालयावरून घरी निघाली तेव्हा आपले पती हे रस्त्यात उभे असलेले तिने पाहिले. पत्नी जवळ येताच राजेंद्र जाधव याने आपल्या हातातील मगमध्ये असलेले पेट्रोल हे पत्नीच्या अंगावर टाकले. पेट्रोल टाकत असताना तो शिवीगाळ करून तुला आज मारून टाकतो, असे बोलत होता. शिवीगाळ करीतच त्याने पत्नीच्या अंगावरील साडीला आग लावली. पेट्रोलमुळे आग तत्काळ भडकली व पत्नीला आगीने वेढले पतीने पेटवुन देताच पत्नीने टाहो फोडला व आरडाओरडा सुरू केला. पत्नीने आराडाओरडा केल्याने नराधम पतीने घटनास्थळावरून पळ काढला. इकडे महिलेच्या किंकाळय़ा आणि आराडाओरडा ऐकुन चाळीतील लोक धावतच बाहेर आले. बाहेरील गल्लीतील दृश्य पाहुन चाळीतील लोकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. क्षणभर त्यांना काय होतेय तेच समजले नाही. यावेळी सचिन सपकाळ व श्रीनिवास धनपत व इतरांनी समय सुचकता दाखवित महिलेच्या अंगावर पाणी टाकुन आग विझविली.
दरम्यान, आपल्या आईच्या किंकाळय़ा आणि आरडाओरडा ऐकुन तिची मुले जागी झाली, पंरतु घराला नराधम पतीने कुलुप लावले होते. कसेतरी मुले बाहेर पडली तेव्हा आई भाजल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्थानिक लोकांच्या मदतीने मुलांनी आपल्या आईला येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बायना जाधव यांना सातारा येथील शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेची खबर समजतात वाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जान्हवे कराडे यांनी आज दुपारी घटनास्थळाला भेट देवुन पाहणी केली तसेच या घटनेच्या तपासाबाबत महाबळेश्वर पोलिसांनी मार्गदर्शन केले.
फॉरेन्सिक एक्सपर्ट व ठसे तज्ञ यांनी घटनास्थळाला भेट देवुन महत्वाची माहिती गोळा केली पोलिसांनी घटनास्थळावरून काही नमुने देखिल गोळा केले आहेत. पत्नी पेटत्या अवस्थेत पळत असताना त्यांच्या गळयातील मंगळसुत्र एका ठिकाणी पडले होते ते सुध्दा आज पोलिसांनी हस्तगत केले आहे. संशयित आरोपी राजेंद्र जाधव याच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी भादवी 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटनास्थळावरून पळुन गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी महाबळेश्वर पोलिसांनी तीन पथके तयार करून ती पथके फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याचा कसुन शोध घेत आहेत. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पांचगणीचे सहा पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल बिद्रि, पोलिस कर्मचारी श्रीकांत कांबळे हे करीत आहेत.








