माळमारुती पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणानंतर गळा दाबून आपल्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरून माळमारुती पोलिसांनी शनिवारी पतीला अटक केली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
महादेव चंद्राप्पा लमाणी (वय 30) मूळचा राहणार हुलकेरी तांडा, तालुका सौंदत्ती, सध्या राहणार हरिकाका कंपाऊंड, गांधीनगर असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
2 एप्रिल रोजी रात्री रुक्मव्वा लमाणी (वय 28) या महिलेचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला पती व तिच्या सासरच्या मंडळींनी विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, तिच्या भावाने गळा दाबून तिचा खून केल्याची फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी शनिवारी पतीला अटक करण्यात आली आहे.









