अन्यथा आत्मदहन करणार : प्रियांका चौगले
प्रतिनिधी / राधानगरी
राधानगरी तालुक्यातील कुडुत्री येथील मनोहर चौगले आणि सासरे पिराजी चौगले यांच्यावर चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत बोगस डॉक्टर शिवाजी दत्तात्रय पाटील यांच्यावर कारवाई करावी. अशी लेखी तक्रार एक महिन्यापुर्वी प्रियांका मनोहर चौगले यांनी केली होती. अद्याप या डॉक्टरवर कारवाई झालेली नाही. ही कारवाई न झाल्याने प्रियांका चौगले यांनी आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणास बसून आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
राधानगरी तालुक्यातील कुडुत्री येथील मनोहर पिराजी चौगले [ एम एस सी पदवीधर ] हे पुणे येथे एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करत.१४ एप्रिल २०२१ रोजी ते गावी आले होते. त्यानंतर ते घरातूनच ऑनलाइन काम करत होते.२० एप्रिलला मनोहरचे वडील पिराजी चौगले यांना सर्दी,ताप आणि खोकला असा त्रास सुरू झाला त्यांनी कुडूत्री येथील वैद्यकीय व्यवसाय करणारे शिवाजी दत्तात्रय पाटील यांच्याकडे औषध उपचार चालू केले दुसऱ्या दिवशी मनोहर यालाही त्रास सुरू झाला, त्यांनाही याच डॉक्टराकडे उपचार सुरू ठेवले. उपचार करूनही कोणताच फरक न पडल्याने कोल्हापूर येथील एका खाजगी लॅबमध्ये दोघांचीही कोविड टेष्ट केली, रुग्ण आणि कुटूंबियांनी कोविड बाबत विचारूनही गावातील लोक वाळीत टाकतील अशी भीती घालून कोविड टेस्टला विलंब केला आणि खाजगी लॅबचा पॉजिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर कोल्हापूर येथील आपल्या मर्जीतील खाजगी दवाखान्यात दाखल केले.
या डॉक्टर मुळेच आपले पती आणि सासरे यांचा बळी गेल्याचा आरोप करत श्रीमती प्रियंका यांनी ७ जून रोजी केला होता. या विषयी लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाही केलेली नसल्याने श्रीमती प्रियांका यांनी सासूबाई आणि आपल्या दोन मुलांसह आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करून आत्मदहन करण्याचा इशारा आज दि. ६ जूलै रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
या आशयाचे निवेदन पंचायत समिती आरोग्य विभाग, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार मीना निंबाळकर यांना दिले, यावेळी तहसीलदार मीना निंबाळकर यांनी बोगस डॉक्टर शोधमोहीम पथकाला याबाबत तातडीने चौकशी करण्याचे लेखी आदेश दिले. आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या कनिष्ट सहाय्यकांकडे हे निवेदन दिले.
गटविकास अधिकारी शरद शिंदे यांना याबाबत विचारले असता. शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार चौकशी करून बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. निवेदन देताना कुटूंबियांसह रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसो पाटील सावर्धनकर, आशिष वागरे, अनुपम वागरे, मनोज वागरे, सीताराम वागरे आदी. उपस्थित होते.