अनुराधा कदम / कोल्हापूर
पत्नी ही पतीची अर्धांगिनी म्हणून ओळखली जाते. पण हे केवळ सप्तपदीतील वचन न मानता वास्तव आयुष्यातही ती त्याच्यावरच्या प्रेमासाठी खऱया अर्थाने अर्धांगिनी झाली. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या पतीला आपली किडनी दान करून तिने विवाह संस्कारातील अर्धांगिनी या शब्दाला खऱया अर्थाने मोल दिलं आहे. प्रेमाचा दिवस साजरा होत असताना एकमेकांच्या नात्यांचा बंध नितळ भावनेने गुंफणाऱया भरत शिराळे आणि पद्मश्री शिराळे या दाम्पत्याने प्रेमाचं अनोखं दर्शन घडवले आहे.
गंगावेश परिसरात किराणा मालाचे दुकान चालवणारे भरत शिराळे आणि बेळगावच्या पद्मश्री यांचा विवाह झाला. शुक्रवार पेठेतील कदे गल्लीत या दोघांचा संसार सुरू झाला. मात्र अचानक भरतना रक्तदाबवाढीचा त्रास सुरू झाला. वडिलांचे निधन झाल्यामुळे संसाराची आर्थिक जबाबदारी भरत यांच्यावर होती. पद्मश्री यांनी भरत यांच्या उपचारासाठी अनेक दवाखाने पालथे घातले. तपासणीनंतर भरत यांच्या दोन्ही किडन्या निकामी असल्याचं निदान झालं आणि त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. वयाच्या ऐन चाळीशीच्या उंबरठÎावर भरत यांना हा मोठा धक्का होता. त्यांच्यावर डायलेसिस उपचार सुरू झाले मात्र त्याचा परिणाम त्यांचे वजन घटण्यावर होऊ लागला. त्यांच्यातील ऊर्जा देणाऱया पेशी कमी व्हायला सुरुवात झाली आणि मग पर्याय पुढे आला तो किडनी प्रत्यारोपणाचा. भरत यांच्या आईदेखील शारीरिकदृष्टÎा सक्षम नसल्याने किडनी देण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींचा शोध सुरु झाला. कुटुंबातील कुणाचाच रक्तगट भरत यांच्याशी जुळत नव्हता. त्यावेळी पत्नी पद्मश्री यांनीही रक्त तपासणी करून घेतली आणि सुदैवाने या दोघांचे रक्तगट जुळले. पुण्यातील रुबी हॉस्पटिलमध्ये पद्मश्री यांची एक किडनी भरत यांना प्रत्यारोपित करण्याच्या शस्त्रक्रियेला यश आलं. मरणाच्या दाढेतून पद्मश्री यांनी भरत यांना परत आणलं. आता पद्मश्री आणि भरत हे दोघेही निरोगी आयुष्य जगत आहेत.
सध्या विवाह ठरवत असताना रक्तगट पाहिले जातात पण भरत आणि पद्मश्री यांचे लग्न ठरलं तेव्हा त्यांनी त्यांचा रक्तगट पाहिला नव्हता. पण भरत यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा असताना दोघांचा रक्तगट जुळल्याच्या योगायोगाने या दोघांचे डोळे आजही पाणावतात.
पद्मश्रीने किडनी देण्याची तयारी दर्शवली, तेंव्हा सगळÎाच कुटुंबाने तिला पाठिंबा दिला, मात्र माझा विरोध होता. माझ्यामुळे तिला शारीरिकदृष्टÎा कमकुवत करणार होतो, हे मनाला पटत नव्हतं. पण त्याही परिस्थितीत तिने मला धीर दिला. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भेट मला पद्मश्रीने दिली आहे. खऱया अर्थाने मी तिच्याशी एकरूप झालो आहे.
भरत शिराळे
आयुष्यातला तो प्रसंग आमच्या नात्याची कसोटी पाहणारा होता. फक्त माझ्याच आरोग्याला महत्त्व देत बसले असते तर मी आमचं नातं वाचवू शकले नसते. त्यामुळे मी भरत यांना फक्त माझी किडनी देऊन त्यांना नवं आयुष्य दिलेले नाही तर आमच्या प्रेमालाही नवं आयुष्य दिलं, याचं खूप मोठं समाधन आहे.
पद्मश्री शिराळे